31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
खरीप हंगामामध्ये ‘साथी पोर्टल’ वरून बियाणे वितरण व विक्री – सविस्तर बातमी
या योजनेंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रती महिना पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी संबंधित कलाकार, साहित्यिक महाराष्ट्राचा राहिवासी असणे बंधनकारक आहे. वय 50 वर्षांपेक्षा जास्त असावे. दिव्यांग कलाकार, साहित्यिकांचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असावे. साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यूपर्ण, दर्जेदार व मोलाची भर, तसेच योगदान कमीत कमी 15 वर्ष असावे.
वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य, कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाची महामंडळे, इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, बँक पासबूक, लागू असल्यास पती व पत्नीचा एकत्रित फोटो, दिव्यांगत्व असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला, राज्य, असल्यास केंद्र सरकार पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था, व्यक्ती यांचे शिफारस पत्र असल्यास तसेच अन्य पुरावे जोडावेत.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर 1 ते 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीचे सदस्य सचिव भूषण जोशी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे – यावर्षी 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमात सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारीच्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मातंग समाजासह तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजने’साठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज 15 जुलैपर्यंत सादर करावेत असेही कळविण्यात आले आहे.
ही शिष्यवृत्ती मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा पोटजातींसाठी राबविण्यात येते. महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार प्रथम 3 ते 5 विद्यार्थी- विद्यार्थीनींना उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
विद्यार्थ्यांनी गुणपत्रके, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आदी कागदपत्रासह जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन जवळ, येरवडा, पुणे दूरध्वनी क्र. 020-29703057 येथे अर्ज करावेत, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.