वैभवी देशमुखच्या प्रगल्भ विचारांना उपस्थितांचा सलाम
Marathinews24.com
पुणे – मस्साजोग येथील सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सामाजिक ऐक्य आणि न्यायाच्या लढ्याचा संदेश देणारा ‘साथी हात बधाना’ हा कार्यक्रम पुण्यात पार पडला. गांधी भवन, कोथरूड येथे २३ एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमात देशमुख कुटुंबीयांची उपस्थिती भावनिक वातावरण निर्माण करणारी होती. कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, ही हत्या सहज घडलेली नाही, यामागे सखोल आणि अचूक प्लॅनिंग आहे. गुन्हेगारांना राजकारणाचे पाठबळ असल्यामुळेच त्यांची अशी ही हिम्मत वाढते.
आयोजक, प्रमोद प्रभुलकर यांनी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला प्रश्न विचारला की, पुढे तू मतदान करायला जाशील, त्यावेळी तुला नवीन कुठल्या पक्षाची अपेक्षा आहे का? तिचे हे उत्तर उपस्थितांना अंतर्मुख करणारे ठरले. सध्या मला तुम्ही न्यायाची अपेक्षा आहे. जे पक्ष जनतेच प्रतिनिधित्व करणार आहेत, त्यांनी नागरिकाच्या गरजा ओळखून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. घर, गाडी, बंगला मिळवण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा आधार न घेता स्वतःच्या मेहनतीवर उभे राहिले पाहिजे अशी ठाम भूमिका वैभवी हिने व्यक्त केली.
या कार्यक्रमात अंजली दमानिया, सकाळचे संपादक सम्राट, फडणीस, ॲड. असीम सरोदे आणि माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे व मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी देशमुख कुटुंबीयांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. या लढ्याला केवळ सहवेदनेने नव्हे, तर कृतीतून साथ देण्याची गरज असल्याचा सूर एकवटला.