पोलीस आणि मनपाची संयुक्त मोहीम
marathinews24.com
पुणे – शहराचे वाढते विद्रुपीकरण रोखण्यासाठी पोलीस व महापालिकेने अवैध फ्लेक्सविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. आठवड्याभरात शहर फ्लेक्समुक्त झाल्याचे चित्र दिसेल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी ( दि. ११) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम हे उपस्थित होते.
गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर – सविस्तर बातमी
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, शहरात अलीकडच्या काळात अनधिकृत फ्लेक्सची संख्या बेसुमार वाढली असून त्यामुळे शहर विद्रुप होत चालले आहे. प्रत्येक चौकात, तसेच प्रत्येक रस्त्यावर भलेमोठे अनधिकृत फ्लेक्स उभे करण्यात आलेले आहे. त्यापैकी बहुतांश फ्लेक्स हे कोणत्या ना कोणत्या नेत्याला अथवा कार्यकर्त्याला शुभेच्छा देणारे आहेत. पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडे ३ हजार अधिकृत फ्लेक्सची नोंद असून त्या माध्यमातून दरवर्षी ४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, अधिकृत संख्येच्या कितीतरी पटींनी अधिक फ्लेक्स सध्या उभारण्यात आले आहेत. त्यामुळे, शहर कमालीचे विद्रुप होत चालले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे दिले. त्यानंतर, पोलीस व महापालिका प्रशासनाने त्यासाठी विशेष धडक मोहीम आखली आहे. त्याअंतर्गत आठवड्यात पुणे शहर फ्लेक्समुक्त झालेले दिसेल. बेकायदा फ्लेक्स लावण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले सर्वजण म्हणजे शुभेच्छुक, कार्यकर्ते, फ्लेक्सचे प्रिंटर, फ्लेक्स उभारून देणारी मंडळी या सर्वांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार यास्वरुपाचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार आहेत.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, पोलीस अधिकारी व महापालिका अधिकारी यांच्या समन्वयातून फ्लेक्सबरोबरच फेरीवाल्यांविरुद्धही कारवाई करण्यात येणार आहे. विशेषतः फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण कारवाई केल्यानंतर पुन्हा तेथे अनधिकृत फेरीवाल्यांची गर्दी होते. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांच्या समन्वयातून कडक उपाययोजना केली होणार आहे. त्याचबरोबर मॉन्सूनपूर्व कामे, पाणी तुंबण्याचे प्रकार, अडचणीचे फूटपाथ, विलंबित वाहतूक अशा अनेक विषयांवर पोलिसांशी समन्वय साधून मार्ग काढला जाईल.























