मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात घडली घटना
marathinews24.com
पुणे – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात सिग्नलला थांबलेल्या वाहनांवर ट्रक आदळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघाताची घटना घडली. शुक्रवारी पहाटे बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रक एका वाहनावर आदळून ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकमधील दोन मदतनीस (क्लिनर) जखमी झाले.
कात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी
नासीर मोहम्मद शाह मोहम्मद चौधरी (वय ३६, सध्या रा. कुदळवाडी, मोशी रस्ता, चिखली, मूळ रा. कलवारीनानकार, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. अपघातात ट्रकमधील मदतनीस अर्जुनकुमार मौर्या (वय २४, सध्या रा. मोरे चौक, अशोक काॅलनी, चिखली) याच्यासह आणखी एक जण जखमी झाला. याबाबत मौर्या याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक नासीर चौधरी हा शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन भरधाव निघाला होता. जांभुळवाडी परिसरात भरधाव ट्रकचालक चौधरीचे नियंत्रण सुटले आणि ट्रक एका वाहनावर आदळला. अपघातात ट्रकच्या केबीनचा चुराडा झाला. ट्रकचालक चौधरी, मदतनीस मौर्या आणि आणखी एक जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या चैाधरी याच्यासह तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच चौधरीचा मृत्यू झाला होता. भरधाव ट्रक चालवून अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मारुती वाघमारे तपास करत आहेत.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान असलेल्या सात किलोमीटरच्या तीव्र उताराच्या अंतरात अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, तो नियम सर्रास धुडकाविण्यात येत असल्याचे दिसते. त्यामुळे गंभीर अपघात घडतात. या अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. वाहन चालकांचा बेदरकारपणाही याला कारणीभूत ठरत आहे.






















