शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त आलेल्या शिवभक्तांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनगणना २०२७ तयारीला वेग; घर यादी गट अचूक नोंदविण्याचे निर्देश – सविस्तर बातमी
सदर कार्यक्रम बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. रायरेश्वर मंदिर परिसर, ता. भोर, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात शाहिरी, गायन व वादन सादरीकरणाच्या माध्यमातून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी इतिहासाचा जागर करण्यात येणार आहे. रायरेश्वर ही स्वराज्याची शपथभूमी असल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमातून शिवचरित्र, स्वराज्याची संकल्पना, शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून उपस्थित शिवभक्त व नागरिकांना प्रेरणादायी सांस्कृतिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. मंत्री ॲड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान) यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, रायरी ग्रामपंचायत, स्वराज्यभूमी प्रतिष्ठान तसेच स्थानिक सेवाभावी संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
रायरेश्वर उत्सवानिमित्त आयोजित या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील शिवभक्त, नागरिक व सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.





















