चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पादत्राणांच्या लोखंडी जाळी, कुंडी, तसेच दरवाज्याजवळ लपविलेली चावी चाेरून सदनिकेतून ऐवज चोरीला घटना घडतात. वडगाव शेरी भागात अशीच एक घटना घडली. खिडकीत ठेवलेली चावी चोरुन चोरट्यांनी सदनिकेतून १० लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरट्यांकडून दोघांची १ कोटी २६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात असलेल्या एका साेसायटीत राहायला आहेत. सदनिकेच्या खिडकीत त्यांनी चावी ठेवली होती. कामानिमित्त त्या बाहेर पडल्या. चोरट्यांनी खिडकीत ठेवलेली चावी चोरली. सदनिकेचे कुलूप उघडून चोरट्यांनी कपाटातील सोने-चांदीचे दागिने, रोकड असा दहा लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. सदनिकेत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे तपास करत आहेत.
आंबेगाव भागात घरफोडी
कात्रज-आंबेगाव परिसरातील जांभुळवाडी रस्त्यावरील एका सोसायटीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा दाेन लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी शैलेंद्र साठे तपास करत आहेत.























