पब पीआरओच्या संपर्कात ड्रग पेडलर
marathinews24.com
पुणे – अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या तपासाचे धागेदोरे थेट ड्रग पेडलरसह ग्राहकांना मेफेड्रॉन (एमडी) पुरवठ्यापर्यंत पोहचले आहेत. त्यापार्श्वभूमीवर एमडीची नशा करणार्यांची पोलिस आयुक्तालयात हजेरी घेण्यात आली. विशेष म्हणजे, यातील काहींचा संपर्क शहरातील काही पबच्या पीआरओ (पब्लिक रिलेशन ऑफिसर) शी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
पुणे पोलिसांचा टेक्नोसॅव्ही उतारा, गुन्हा नोंदणीसाठी घेणार एआयची मदत – सविस्तर बातमी
उत्तमनगरमधील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे दुरवर गेले असून, नशा करणार्यांमध्ये गावचा उपसरपंच, मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारी, कुरिअर बॉय, कामगार, बांधकाम व्यावसायिक, रिक्षाचालक, इस्टेट एजंट, वाहनचालक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. अशा २१ जणांना आयुक्तालयात बोलावून त्यांची पोलिस आयुक्तांसमोर परेड घेण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून डोजियर भरून घेण्यात आले. यापूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्या आणि १४ गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीसह त्याच्या साथीदारांना उत्तमनगर पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती.
मुख्य आरोपी सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (वय ३७), जतीन जयवंत कदम (वय २६, रा. वारजे) आणि शुभम संतोष दहिभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) यांचा समावेश आहे. मुलीचे अपहरण करणार्या राठ्या राठोडकडे चौकशीदरम्यान मेफेड्रॉनच्या दोन पुड्या आढळून आल्याने मोठे ड्रग रॅकेट उघडकीस आले. ड्रग्ज विक्री करणारे आणि सेवन करणारे अशा ७६ जणांची माहिती पोलिसांना मिळाली. तपासात आरोपीने अनेक युवकांना ड्रग्ज विक्री केल्याचे तसेच तीन जणांकडून ते खरेदी केल्याचे समोर आले आहे. ड्रग विक्रीसाठी करण्यात आलेले ऑनलाईन व्यवहारही पोलिसांच्या हाती लागले आहेत. पुढील तपास एसीपी शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
राठोडच्या मोबाईलची तपासणी केली असता, गेल्या चार महिन्यांत सुमारे ३०० हून अधिक व्यवहार झाल्याचे आढळले. या व्यवहारांची एकूण रक्कम सुमारे ९ लाख रुपये असून, त्यामध्ये दोन ते अडीच हजार रुपयांच्या व्यवहारांचे प्रमाण अधिक आहे. काही व्यवहार १० ते १५ हजार रुपयांपर्यंतचेही असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, एमडीची नशा करणार्यांवर कारवाई करत त्यांना आयुक्तालयात आणून परेड घेण्यात आली.





















