पीएमपी बस पळविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

तरुणाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महापालिका भवन परिसरातून पीएमपी बस पळवून नेणाऱ्या तरुणाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गोपालसिंह दिलवरसिंह राणा (वय २०, रा. घटासरी, गढवाल, उत्तराखंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीएमपीचे पर्यवेक्षक (चालक विभाग) ऋषीकेश मुटके (वय २८) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी तरुणाविरुद्ध चोरी करणे, तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका भवन परिसरातून एका तरुणाने पीएमपी बस पळवून नेल्याची घटना शनिवारी (२५ एप्रिल) घडली.

पोलीस हवालदारला धक्काबुक्की; चौघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

जंगली महाराज रस्त्यावरून गोखले रस्त्यापर्यंत आलेली ही बस पोलिसांनी प्रसंगावधान राखून थांबवली. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. पीएमपीच्या स्टेअरिंगजवळ लावलेली चावी चालक विसरून गेला. ती पाहून तेथून निघालेल्या तरुणाने त्या चावीने बस सुरू केली आणि महापालिका भवन, जंगली महाराज रस्त्यावरून बस नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता) रस्त्यापर्यंत नेली. त्या वेळी गोखले स्मारक चौकात एक कार्यक्रम सुरू होता. पीएमपी बस पळवून नेल्याची माहिती मिळाल्यानंतर गोखले स्मारक चौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून बस अडविली.

बस चोरी करुन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी उत्तराखंडमधील तरुणाच्या आईशी संपर्क साधला. तरुण पुण्यात कसा आला, याबाबतची माहिती त्याच्या आईला नाही. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तरुण सतत बोलत होता. त्याचे वर्तन पाहता पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×