तरूणाच्या डोक्यात बाटली फोडली, दगडफेकही केली
marathinews24.com
पुणे – तडीपार असतानाही सराईत टोळीने लोणी काळभोर परिसरात दहशत माजविली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आमच्याकडे का पाहतो, असे म्हणून सराईत राज पवार याच्या टोळीने तरुणाच्या डोक्यात बाटली फोडून गंभीर जखमी केले आहे. ही घटना १६ मे रोजी कदमवाक वस्तीवरील सागर रेस्टो व बारमध्ये घडली आहे. याप्रकरणी चौघाविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे विमानतळावरून पळण्याच्या डाव फसला – सविस्तर बातमी
राज रवींद्र पवार (वय २९, रा. कदम वाक वस्ती, लोणीकाळभोर), प्रेम तानाजी गायकवाड, सौरभ सुनिल गायकवाड, राहुल घाडगे (सर्व रा. कवडीपाट, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद दिलीप शेंडगे (वय ३०, रा. कवडीपाट टोलनाका, कदमवाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रसाद शेंडगे हे सागर रेस्टो व बारमध्ये जेवण करत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागील टेबलावर राज पवार व त्याचे साथीदार बसले होते. त्यांनी तू आमच्या कडे का पाहतो, आम्ही येथील भाई आहोत, असे म्हणत प्रसादला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. टेबलावर असलेल्या बिअरच्या बाटल्या डोक्यात, छातीवर, नाकावर, कानावर, गळ्यावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. दगड फेकून मारुन तुझा मर्डर करुन टाकतो, अशी धमकी दिली. तसेच बाहेर उभ्या असलेल्या तुकाराम राजेंद्र कांबळे (रा. लडकत रोड, शिवनगर, मुंढवा) यालाही मारहाण केली. त्यानंतर हे सर्व जण फरार झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव तपास करीत आहेत.
सराईत पवार टोळीविरूद्ध विविध गंभीर गुन्हे
सराईत राज पवार याच्या टोळीची लोणी काळभोर परिसरात दहशत आहे. टोळीविरूद्ध लोणी काळभोर, हडपसर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याला डिसेंबर २०२१ मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तसेच त्याच्यासह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. दरम्यान, रस्ता अडवुन वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी राज पवारासह १६ जणांवर लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर २२ डिसेंबर २०२५ रोजी पवार याच्या आईवडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून गोंधळ घातला होता.
























