७० सीसीटीव्ही फुटेज तपासून लागला छडा
marathinews24.com
पुणे – शहरातील मांजरी-केशवनगर परिसरात संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, हा खून नसून डंपरच्या धडकेत झालेला अपघाती मृत्यू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तीन दिवसांत ७० सीसीटीव्ही फुटेज तपासून डंपर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिपन्ना पत्याप्पा राठोड (वय ४१, रा. मोमीननगर, मांजरी) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
बनावट सोने तारण ठेवून बँकेची ४ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी-केशवनगर येथील रणजित लोणकर यांच्या मोकळ्या जागेत दि. १६ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ४१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुरुवातीला अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यातून मृत व्यक्तीची ओळख टिपण्णा पत्याप्पा राठोड (वय ४१, रा. मोमीननगर, मांजरी) अशी पटली. राठोड याला दारूचे व्यसन असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मित्रांकडून आणि तो नेहमी जात असलेल्या ठिकाणांवरून अधिक माहिती गोळा केली.
तांत्रिक विश्लेषणातून १५ मेच्या रात्री उशिरा राठोड घटनास्थळी आल्याचे दिसून आले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास एक डंपर त्या ठिकाणी जाऊन परतल्याचे सीसीटीव्हीत आढळले. तब्बल ७० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संबंधित डंपर हा बी.टी. कवडे रोड परिसरातून माती व राडारोडा टाकण्यासाठी त्या भागात येत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, राठोड हा दारूच्या नशेत रस्त्याकडेला झोपला होता. त्यावेळी डंपर चालकाला तो दिसला नाही आणि डंपरची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पिगुवाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय माळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोमण तसेच पोलिस अंमलदार कविराज पाटील, रोहिदास उगले, राहुल मोरे, शिवाजी धांडे, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, विशालदादा बनकर, रुपेश तोडेकर, सचिन बोराटे, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर यांच्या पथकाने केली.






















