पुणे पोलिसांच्या अपयशाची मालिका कायम
marathinews24.com
पुणे – शहरात कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असतानाच बुधवारी (दि.२०) भरदिवसा टोळीयुद्धाचा भडका उडाल्याचे दिसून आले. सराईत आंदेकर टोळीने माजी नगरसेवकर वनराज आंदेकर याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या भावावर पिस्तूलातून गोळीबार केला. त्यानंतर त्याच्या चेहर्यावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्या झालेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोयता, पिस्तूलांचा बाजार रोखण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याचे घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
मोबाईलवर ‘एपीके’ फाईल पाठवून ५० हजारांची फसवणूक – सविस्तर बातमी
अक्षय उर्फ बाळा बापू म्हस्के (वय २६, रा. श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ, सर्व्हे क्रमांक २५, आंबेगाव पठार, धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (दि.२०) सकाळी दहाच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील हॉटेलसमोर घडली आहे. हल्ल्याप्रकरणी ऋषीप्रसाद मोहन आंबट (वय २१, रा. तालीम, नाना पेठ), आवेज अशपाक शेख (वय २६, गणेश पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे ( वय १९, रा. भवानी पेठ, पालखी विठोबा चौक), अमन फारुक बागवाले ( वय २१, रा. गोल्डन ग्रेस, भवानी पेठजवळ) या चौघांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत खून झाला होता. त्यावेळी अक्षय म्हस्के याचा भाऊ आरोपी आकाशला पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत आकाशने खूनातील आरोपींना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिल्याचे उघडकीस आले. तेंव्हापासून आंदेकर टोळी बदला घेण्यासाठी प्रयत्न करीत होती. अक्षय हा बुधवारी सकाळी धनकवडीतील बालाजीनगर परिसरात नाश्ता करण्यासाठी गेला होता. राजर्षी शाहू बँक चौकात तो रिक्षात बसलेला असता, दुचाकीवरुन आलेल्या चौघा हल्लेखोरांनी अक्षयवर पिस्तुलातून गोळीबार केला. पायात गोळी शिरल्यामुळे तो खाली पडला. नेमकी संधी साधून हल्लेखोरांनी पुन्हा त्याच्या चेहर्यावर कोयत्याने वार केले.
आरोपींनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला. याप्रकरणाची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्यासह गुन्हे शाखेचे उपायुक्त गौहर हसन यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अक्षयला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. ‘प्राथमिक चौकशीत वैमनस्यातून अक्षय म्हस्के याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोधार्थ पोलिसांची पथके रवाना केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
खूनाचा बदला घेतला नातवाच्या खून करून
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केल्याची घटना १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम चौकात झाली होती. कौटुंबिक वाद, संपत्ती, वर्चस्वातून टोळीने त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष (वय २०, रा. लक्ष्मी सोसायटी, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) याचा गोळीबार करुन खून ५ सप्टेंबर २०२५ रोजी केला होता. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला आयुषचा खूनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. आयुष हा आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा नातू होता.
टोळीने आरोपीच्या भावाचा केला दुसरा खून
वनराजच्या खूनानंतर सुडाने पेटलेल्या टोळीने पहिल्या खूनानंतर अवघ्या दोन महिन्यातच १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुसरा खून केला. वनराजच्या खूनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ रिक्षाचालक गणेश किसन काळे (वय ३२, रा. येवलेवाडी, कोढवा) याचा कोंढव्यातील खडी मशीन चौकात गोळ्या झाडून खून केला. दरम्यान, वनराजच्या खून प्रकरणातील आरोपींना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिल्याप्रकरणी समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली होती.
नवनियुक्त अपर पोलीस आयुक्त, उपायुक्तांना अशीही सलामी
खून, खूनाचा प्रयत्न, कोयते गँगचा धुडगूस अशा गंभीर घटनांनी पुणेकरांमध्ये धास्ती आहे. असे असतानाच दोन दिवसात तिघांच्या खुनाचा प्रयत्नाच्या घटना घडल्या आहेत. तसेच चार खूनचे प्रकारही घडले आहेत. सहकारनगरच्या हद्दीत अक्षय काळे याच्यावर गोळीबार, कात्रज बाह्यवळण मार्गावर रिक्षा चालकावर कोयत्याने वार, कोथरूड भागात तरुणावर वैमनस्यातून गजबलेल्या रस्त्यावर कोयत्याने वार केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच नवनियुक्त गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच अशा गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे चर्चेला उधाण आले आहे.
धनकवडी परिसरात रिक्षाचालक अक्षय म्हस्के याच्यावर आरोपीने पिस्तूलातून चार राउंड फायर केले. त्यातील एक गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर इतर आरोपींनी अक्षयर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्याला रूग्णालयात दाखल केले असून, आरोपींच्या शोधार्थ विविध पथके रवाना केली आहे.
राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर























