काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर घोषणाबाजी केल्याची घटना घडली. अभाविपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुष्कर आबनावे, भूषण रानभरे, अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, सागर धाडवे यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ‘अभाविप’चे कार्यकर्ते मल्हार नीलेश पाटील (वय १९) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
छात्रों की गुंज’ कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी – सविस्तर बातमी
राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम शनिवारी (२२ ऑगस्ट) ‘एसएसपीएमपीएस’ प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला. अभाविपचे कार्यकर्ते शुक्रवारी सायंकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) वसतिगृह परिसरात जमले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी दबाव आणला, असा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली. काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते समाेरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर युवक काँग्रेस आणि एनएसयुआयच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली, असे पाटील याने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


























