आम्हीच इथले भाई म्हणत, परिसरात धुडगुस
marathinews24.com
पुणे – जुन्या वादातून तरुणाला धडा शिकवण्यासाठी टोळक्याने हवेत कोयते फिरवुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. आम्हीच इथले भाई म्हणत, परिसरात धुडगुस घातल्याची घटना २५ ऑग्स्टला रात्री पावणेबाराच्या सुमारास मांजरी बुद्रुक मधील मांजराई देवी मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असुन, चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. यश बाळासाहेब भगत (वय १८ रा. कुंजीरवस्ती, मांजरी बुद्रूक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. समर्थ क्षीरसागर (वय १८ रा. मांजरी बुद्रूक) याने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार, मांजरीतील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण समर्थ क्षीरसागर मांजरी परिसरात राहायला असून, काही दिवसांपूर्वी त्याचे आरोपींसोबत भांडण झाले होते. त्याच रागातून २५ ऑगस्टला रात्री पावणेबाराच्या सुमारास आरोपींनी त्याला गाठले. शिवीगाळ करुन आज तुझा गेम वाजवणार म्हणत धमकी दिली. त्यानंतर हातातील कोयते हवेत फिरवुन परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. आम्हीच इथले भाई असल्याचे म्हणत कोयते हवेत फिरवले. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार टोळक्याचा शोध घेतला. चौघा अल्पवयीन यांना ताब्यात घेतले. त्यातील यश भगत याला अटक केली आहे. उपनिरीक्षक प्रियंका चव्हाण तपास करीत आहेत.
वादातून कोथरुडमध्ये दोघांवर वार, टोळक्याला अटक
जुन्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना २५ ऑगस्टला रात्री साडेनउच्या सुमारास कोथरुडमधील पौड रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी टोळक्याला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. ऋषीकेश वाघमारे (वय २८) प्रसाद उर्फ मुन्ना मोरे (वय २२) आदित्य सकटे (वय २४) हरिष वाघमारे (वय ३० सर्व रा. मांगवाडा गुजरात कॉलनी, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साहिल ठोंबरे आणि आदित्य दादा मारणे (वय २४ रा. भुगाव, हवेली) जखमी झाले असून, आदित्यने कोथरुड ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आदित्य हा भुगावमध्ये राहायला असून, काही दिवसांपूर्वी त्याचे आरोपींसोबत वादविवाद झाले होते. त्याच रागातून टोळक्याने २५ ऑगस्टला रात्री नउच्या सुमारास तक्रारदार आदित्य सह साथीदार साहिल ठोंबरे याला चांदणी चौकाकडे जाताना पौड रस्ता परिसरात अडवले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन खुनी हल्ला केला. त्यानंतर टोळके पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ चौघा हल्लेखोरांचा शोध घेउन ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, जुन्या वादातून वार केल्याचे सांगितले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करीत आहेत.


























