कोंढवा पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – दुचाकी वाहनांमध्ये फेरफार (मॉडीफिकेशन) करीत सायलेन्सद्वारे आवाज काढणार्या वाहन चालकांसह रस्त्यावर वाढदिवस साजरा करणार्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार थेट गुन्हा दाखल करुन संबंधितांची वाहने जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे बुलेटच्या सायलेन्सर सह इतर दुचाकींमध्ये मॉडिफिकेशन केल्यास कारवाईच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुलेटच्या सायलेंन्सरमध्ये बदल करुन फटाक्यांचा आवाज काढणार्या वाहन चालकांविरूद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या दोन बुलेट ताब्यात घेण्यात आल्या असून, कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर वाढदिवस साजरा करीत वाहतूककोंडी निर्माण करणार्यांनाही दणका देण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे अमलदार सुरज शुक्ला आणि संतोष बनसुडे हे २६ ऑगस्टला हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी बुलेटच्या सायलेन्सद्वारे फटाक्यांचा आवाज काढणार्या दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करीत दोन बुलेट जप्त केल्या आहेत.
कोंढवा परिसरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करीत असलेल्या टोळक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही अशापद्धतीने नियमांचे उल्लंघन करणार्या बेशिस्त दुचाकीस्वारांसह रस्त्यावर वाढदिवस साजरा करुन वाहतूकीला आडकाठी निर्माण करणार्याविरूद्ध थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सागर पवार, शरद वाकसे, अमोल हिरवे, रवींद्र चिप्पा, विशाल मेमाणे, स्वागत पळसे, अमित सुर्यवंशी, पुषेंद्र चव्हाण, राहुल रासगे यांनी केली.


























