राग गावतीपासून चित्रपटगीतांपर्यंत… शंतनू गोखले यांच्या संतूरवादनाने जिंकली रसिकांची मने
marathinews24.com
पुणे – सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त सहजीवन गणेश मंदिर मंडप, सहकारनगर क्रमांक २ येथे आयोजित संतूरवादक शंतनू गोखले यांच्या बहारदार संतूरवादनाच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य असलेल्या शंतनू गोखले यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, चित्रपटसंगीत आणि विविध धुन यांचा सुरेल संगम घडवत उपस्थितांना अविस्मरणीय संगीतानुभव दिला. तबल्याची मोलाची साथ ओंकार तोडकर यांनी दिली. तबला आणि संतूर वादनाच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले.
भरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलत – सविस्तर बातमी
कार्यक्रमाची सुरुवात राग गावतीने झाली. रूपक तालातील सात मात्रांच्या रचनेने मैफलीला सुरेल प्रारंभ झाला. त्यानंतर तीनतालातील सादरीकरणातून रागाचे विविध पैलू खुलवत त्यांनी शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा रसिकांसमोर उलगडली. भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेशी शास्त्रीय संगीताचे असलेले नाते अधोरेखित करत त्यांनी संतूर ऐकताना काही क्षण डोळे बंद करून स्वरांचा अनुभव घेण्याचे आवाहन केले.
त्यानंतर तबल्याची साथ सुरू होताच संतूर आणि तबल्यामधील जुगलबंदीने अप्रतिम लयकारीने कार्यक्रमाला अधिक रंगत आली. पुढे उपशास्त्रीय रचना, चित्रपटगीते आणि विविध धुन यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध व्हायोलिनवादक अतुलकुमार उपाध्ये यांनी आवर्जून उपस्थिती लावली. या सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश दातार, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष सुयश साबडे, कार्याध्यक्ष मदन कटारिया
यांनी सदरील माहिती दिली.




















