गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डाव; बांगडी, सोनसाखळी, दागिने आणि रोकड लंपास
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील दोन लाख रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर घडली. (PMPML Bus Theft Pune) याबाबत एका पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ महिला कात्रजमधील सुखसागरनगर भागात राहायला आहेत. त्या १२ सप्टेंबर रोजी पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या.
पुण्यात गर्दीत महिलांचे दागिने लांबविले – सविस्तर बातमी
प्रवासादरम्यान चोरट्यांनी कटरचा वापर करुन गर्दीत ज्येष्ठ महिलेच्या हातातील दोन लाख दहा हजार रुपयांची बांगडी चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. (PMPML Bus Theft Pune) दुसऱ्या एका घटनेत पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून दागिने आणि रोकड असा ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीएमपी प्रवासी तरुणीकडील दोन लाखांची रोकड लंपास
पीएमपी प्रवासी तरुणीच्या पिशवीतून दोन लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी २१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हडपसर ते बालेवाडी दरम्यान प्रवास करत होती. भेकराईनगर परिसरातील थांब्यावर गर्दी होती. गर्दीत चोरट्यांनी तरुणीच्या पिशवीतून दोन लाखांची रोकड लांबविली. तक्रारदार तरुणी हडपसर भागात राहायला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.
एसटी प्रवासी ज्येष्ठाची सोनसाखळी लंपास
एसटी प्रवासी ज्येष्ठाच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी चोरून नेण्यात आल्याची घटना शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाच्या आवारात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली असून, ते मुंबईतील कुर्ला भागात राहायला आहेत. ते १६ सप्टेंबर रोजी एसटी बसमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.























