अटकेनंतर २४ तासात आरोपपत्र दाखल
marathinews24.com
पुणे – दुचाकीस्वार तरुणीचा विनयभंग करुन पसार झालेल्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर २४ तासाच्या आत लष्कर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
गोव्याला फिरायला जाणे पडले ११ लाखांना – सविस्तर बातमी
अश्विन भीमराव कांबळे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (१४ मे) दुचाकीस्वार तरुणी हडपसर भागातून निघाली होती. त्या वेळी आरोपी कांबळे दुचाकीवरुन तरुणीचा पाठलाग करत होता. त्याने माळवाडीतील डीपी रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणीला अडवले. तिचा विनयभंग केला. माझ्याशी विवाह कर, असे सांगून तिचा मोबाइल हिसकावून तो पसार झाला. या घटनेची माहिती तिने वडिलांनी दिली. त्यानंतर वडिलांनी आरोपी कांबळेला जाब विचारला. तेव्हा त्याने तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पसार झालेल्या कांबळेला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तरुणीचा मोबाइल जप्त करण्यात आला. त्यानंतर तरुणीचा जबाब लष्कर न्यायालयात भारतीय न्याय संहितेतीली कलम १८३ अन्वये नोंदविण्यात आला. घटनास्थळाचा दोन पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला, तसेच पोलिसांकडून आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. तांत्रिक पुरावे संकलित करुन आरोपी कांबळेला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार, पोलीस कर्मचारी शिर्के, दीपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, राठोड, महामुनी, चव्हाण, राऊत यांनी ही कारवाई केली.