परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव
marathinews24.com
पुणे – शहरातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतरच्या वर्षभरात वाहतूक पोलिसांकडून ६ हजार ६५८ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहन चालकांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी नाकाबंदी केली होती.
पुण्यात वर्षभरात ७७ हॉटेल, पबवर कारवाई – रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यास मनाई- सविस्तर बातमी
मद्यपींकडून वाहने भरधाव चालविली जात असल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अपघात रोखण्यासाठी मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांविरुद्धही कारवाईचे आदेश त्यांनी दिले होते.
‘मे २०२४ ते एक मे २०२५ या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ६ हजार ६५८ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली. संबंधित वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्तावही वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविले आहेत,’ अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
अल्पवयीन चालकांवर कारवाईचा बडगा
अल्पवयीन वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. पोलिसांनी ८२ अल्पवयीन दुचाकीस्वारांवर केली असून, गंभीर अपघात प्रकरणात मुलांना वाहने चालविण्यास देणाऱ्या ८ पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.