सोसायटीचा चौकीदार फरार, गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – सोसायटीतील मंदीरात असलेल्या चांदीचा मुकुट, हार आणि पादुकांवर सुरक्षारक्षकानेच डल्ला मारल्याची घटना कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक असलेल्या सोनू सिंग विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार राजू तुकाराम साठे (वय ३४) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीची ओळख पटविण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन गार्डन सोसायटीमध्ये तीन वर्षांपासून काम करत होता. दर गुरुवारी संध्याकाळी सोसायटीतील भगवान स्वामी समर्थ मंदिरात आरती केली जात होती. आरतीनंतर देवाला घातलेला चांदीचा मुकुट, हार आणि पादुका एका ड्रॉवरमध्ये ठेवला जात होता. १४ मे ला सकाळी ‘पँट बदलण्याच्या’ बहाण्याने रोहन ऑफिसमधून निघून गेला होता. त्यानंतर परतला नाही. संशयावरून तक्रारदाराने मंदिराच्या कार्यालयात ठेवलेला ड्रॉवर तपासला तेव्हा त्यात ठेवलेले तीनही चांदीचे दागिने गायब असल्याचे आढळून आले.
संशयातून रहिवाशांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरीत सोनू सिंगचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १८ मे रोजी रात्री तक्रारदार आणि सोसायटीच्या इतर अधिकार्यांनी कोथरूड पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. आरोपीचे नाव सोनू सिंग (वय ३३ वर्षे, रा. उमरिया जिल्हा, मध्य प्रदेश) असे आहे. एचएस फोर्स सिक्युरिटी या सुरक्षा कंपनीमार्फत तो गेल्या एक वर्षापासून सोसायटीमध्ये ड्युटीवर होता. कोथरूड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०६ (चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस कॉन्स्टेबल अजिनाथ तात्या चौधरी यांच्यावर सोपवण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.