दोषारोपपत्रासाठी पोलिसांना न्यायालयाने दिली ३० दिवसांची मुदतवाढ
marathinews24.com
पुणे – कुख्यात गुंड गजानन मारणे याला पुणे पाेलीसांनी माेक्का कारवाईत अटक केल्यानंतर त्याला कारागृहात ठेवले हाेते. मारणेने त्याच्या वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, संबंधित जामीन अर्ज बुधवारी (दि. २१ ) पुणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच याप्रकरणात पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता गुन्हा दाखल झाल्यापासून पुणे पोलीस ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करू शकणार आहे.
तळजाई टेकडीवर तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांच्या चौकशीमध्ये गजा मारणे हा त्याच्या टोळीतील महत्वपूर्ण जवळच्या साथीदारांना वापरण्यासाठी ४ अलिशान फॉर्च्यूनर कार खरेदी करणार होता, ही बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारणेच्या ताब्यातून जप्त केलेली एक फॉर्च्युनर गाडी आणि एक थार गाडी ही त्याने दुसऱ्यांच्या नावावर घेतली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोथरूडमध्ये एका अभियंताला मारहाण प्रकरणात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली असून, सराईत रुपेश मारणे हा इतर साथीदारांसह पसार आहे. जे आरोपी पसार झालेले आहेत त्यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात आलेले असून त्यांना लवकरच फरार घोषित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे मारणे टोळीतील साथीदारांच्या मालमत्ताबाबत पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.