तीन अल्पवयीन ताब्यात
marathinews24.com
पुणे – अल्पवयीनांमध्ये झालेल्या वादातून दहशत माजविण्यात आल्याची घटना घडली. टोळक्याने मीठानगर भागातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या तीन रिक्षा आणि दोन मोटारींच्या काचा फोडल्या. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. अतिक अहमद शेख (वय ४८, रा. मीठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक शेख हे रिक्षाचालक आहेत. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तीन ते चार जण दुचाकीवरुन मीठानगर परिसरात आले. टोळक्याने गल्ली क्रमांक दोनच्या परिसरात रिक्षाच्या काचेवर कोयता आपटून काच फोडली. त्यावेळी तेथून एक माेटारचालक निघाला होता. टोळक्याने मोटारीची काच कोयत्याने फोडली. मोटारचालक खाली वाकल्याने त्याला इजा झाली नाही. मोटारीच्या दरवाज्यावर कोयते आपटून टोळक्याने दहशत माजविली. टोळक्याने परिसरातील दोन मोटारी आणि रिक्षाच्या काचा फोडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी तीन अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वादातून अल्पवयीनांचा एकाबरोबर वाद झाला होता. वादातून टोळक्याने दहशत माजवून वाहनांच्या काचा फोडल्या. पसार झालेल्या एका आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिली.























