पतीच्या डोळ्यादेखत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची लूट
marathinews24.com
पुणे – पतीसोबत असतानाही दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेजवळ येउन तब्बल ७० हजार रूपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १८ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास वंडरसिटी मुख्य गेटसमोरील रस्त्यावर घडली आहे. चोरट्यांना कशाचीही भीती राहिली नसल्याचे दिसून आले आहे. मागील काही काही दिवसांपासून सातत्याने दुचाकीस्वार चोरट्यांकडून मंगळसूत्र हिसकावून नेले जात आहेत. मात्र, तरीही स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाईचा बडगा का उगारला जात नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
भरधाव मोटार चालकाने दुचाकीस्वार महिलेला उडविले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार राजश्री मिलींद कुलकर्णी (वय ४४, रा. कात्रज) कुटूंबियासह कात्रजमध्ये राहायला आहेत.१८ मे रोजी रात्री जेवण केल्यानंतर राजश्री पतीसोबत शतपावली करण्यासाठी जात होत्या. घरातून काही अंतर चालून गेल्यांनतर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर राजश्रीजवळ येउन चोरट्यांनी ७० हजारांचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. पती मिलींदसोबत असतानाही चोरट्यांनी धाडस केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, कुलकर्णी दाम्पत्याने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करीत आहेत.