दोन महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी
marathinews24.com
बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यातील माजलगाव येथील पुरुषोत्तमपुरीत धक्कादायक घटना घडली आहे. गोदावरी नदीपात्रात भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर १२ वर्षीय मुलगा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. नदीपात्रात बेपत्ता मुलाचा व इतर भाविकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन – अभिजित दिपके यांचा इशारा – सविस्तर बातमी
शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रामीण पोलिसांकडे सुरक्षिततेची जबाबदारी आहे तर महसूल प्रशासनाने धार्मिक सोहळ्यादरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी नियोजन करणे आवश्यक होते, मात्र नियोजन नसल्याने मंदिर समिती आणि प्रशासन करतंय काय ? आणि या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार राहणार का ? प्रशासना विरोधात उलट्या सुलट्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे. देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. बुधवारी ( दि.१०) नदी पार करण्यासाठी भाविकांनी भरलेली बोट गोदावरी नदीच्या मध्यभागी पोहोचताच अचानक तोल जाऊन बोटीवरील नियंत्रण सुटल्याने उलटली. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.
बोटीत सुमारे ४० ते ५० प्रवासी होते. बोट उलटल्यानंतर सर्व प्रवासी नदीत पडले. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाच्या मदतीने अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र एक अल्पवयीन मुलगा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत प्रणिला शेषेराव राठोड (वय ५५, रा. लोणार) यांचा व ईतर एका महिलेचा मृत्यू झाला. तर सिंधूबाई अर्जुन मवाळ (वय ७५, रा. महागाव, जि. वाशिम) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, यात्रास्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बोटीतून प्रवास करणार्या भाविकांना लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात येत नसल्याची तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याशिवाय लोकप्रतिनिधींवर भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे
भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ?
एवढ्या मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनाची या ठिकाणी कमतरता होती. नदीकाठावर पुरेशा प्रमाणात बचाव साहित्य, लाइफ जॅकेट, प्रशिक्षित बचाव पथके व नियंत्रण यंत्रणा उपलब्ध नव्हती त्यामुळे दोन भाविकांना जीव गमवावा लागला असून याला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.






















