सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभिजित दिपके करणार आंदोलन
marathinews24.com
पुणे – देशातील शिक्षण व्यवस्थेचे अपयश आणि नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे तणावात गेलेल्या सहा ते सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. केवळ नीट परीक्षाच नाही तर सीबीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमधील वाढता गोंधळ यासारख्या प्रकारांमुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा आम्ही देशव्यापी आंदोलन करू, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, उद्या (दि.११) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दुपारी चार वाजता आंदोलन करण्यात येणार असून हे आंदोलन जंतर-मंतरपेक्षाही मोठे असेल, असेही दिपके यांनी सांगितले.
संघाच्या कार्यालयासह महापौर कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा – सविस्तर बातमी
अभिजीत दिपके म्हणाले, केवळ नीटच नव्हे, तर सीबीएससी, एसएससी जीडी, सीयूईटी आणि इतर परीक्षांमधील गोंधळांमुळे तब्बल एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तरीही याची सरकारमधील कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. या संपूर्ण अपयशाला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. गुरूवारी (दि.११) पुण्यात होणार्या आंदोलनाने या देशव्यापी आंदोलनास सुरूवात होईल. त्यानंतर लखनौ, अमृतसर, जयपूर आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही शांततेत व लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करण्यात येणार आहे. यानंतरही केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही तर २० जून रोजी देशभरातील तरुण दिल्लीत एकवटतील आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय तिथून माघारी परतणार नाहीत, असा ठाम निर्धार दिपके यांनी यावेळी व्यक्त केला.
कॉक्रोच जनता पार्टीची कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही. मात्र, तरूणांच्या प्रश्नावर कोणाला आम्हाला समर्थन द्यायचे असेल तर त्यांचे स्वागत करू असेही त्यांनी सांगितले. देशात पेपर लीक होत आहेत, सर्व्हर डाऊन होत आहे आणि विद्यार्थी न्याय मागून थकले आहेत. मात्र, याची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नाही. व्यवस्थेच्या अपयशामुळे लाखो तरूणांचे आयुष्य बर्बाद होत आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. तुमच्यामुळे करोडो विद्यार्थ्यांचे वाटोळे होत आहे. याची नैतिक जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी घ्यावी व राजीनामा द्यावा यासाठी ६ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे हजारो तरुणांच्या उपस्थितीत शांततापूर्ण मार्गाने आम्ही आंदोलन केले. यावरून हे सिद्ध झाले आहे की, देशातील तरुण आता घाबरणार नाही आणि मागेही हटनार नाही, असे ही दिपके यांनी सांगितले. कॉक्रोच जनता पार्टी या चळवळीला आता अत्यंत व्यापक स्वरूप आले आहे. या लढ्यासाठी मी अमेरिकेला परत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकांनो, तर मुलांना थांबवू नका
पालकांनो तुमची मुले सरकारला जाब विचारत असतील, राजकारणावर बोलत असतील तर तुमच्या मुलांना बोलण्यापासून थांबवू नका. तुम्हाला याची भिती वाटत असेल परंतु माझ्या आईलाही भिती वाटत आहे. धमकी दिली जात आहे. माझी आई तर तू अमेरिकेतून परत येऊच नको, हे तुला अटक करतील, तुझ्यावर हल्ला होईल, असे सांगत होती. परंतु मला यावेच लागेल. आता कोणालातरी बोलावेच लागेल, असे मी तिला सांगितले होते. त्यामुळे मी सगळ्या आई-वडिलांना सांगेन की, तुमच्या मुलांना बोलण्यापासून थांबवू नका असे आवाहन दिपके यांनी केले.






















