बाणेर पोलिसांकडून दोन मसाज पार्लरवर छापा
marathinews24.com
पुणे – मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा बाणेर पोलिसांनी पर्दापाश केला आहे. पोलिसांनी बाणेर भागातील दोन मसाज पार्लरवर छापा टाकून गुन्हे दाखल केले. बाणेरमधील बालेवाडी फाटा भागात ‘वेदा स्पा’ मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
सोसायटीत क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी – सविस्तर बातमी
मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अहमद अली (वय २२), तसेच मसाज पार्लर चालविणारी महिला आणि जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हा दाखल केला असून, मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अली याला अटक केली, अशी माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.
बाणेर भागातील ‘२४ थाई स्पा’ या मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. संबंधित मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लर चालक ज्योतीदेवी देवनारायण घोष (वय ३८, रा. गहुंजे), अमनगिरी गोस्वामी (वय २३, रा. मुकाई चौक, रावेत) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घोष आणि गोस्वामी यांना अटक केली आहे. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोालीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील, रुपेश चाळके, पोलीस कर्मचारी भोरे, शिंगे, आहेर, काळे, बर्गे, सोने, माळी यांनी केली.
मसाज पार्लरसाठी जागा देणाऱ्यांवर थेट गुन्हे
मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी शहर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी ३६ गुन्हे दाखल केले होते. मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार सुरू असल्यास मसाज पार्लर चालक, व्यवस्थापक, तसेच मसाज पार्लरसाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.