वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तात्काळ हाती घ्यावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करा- विभागीय आयुक्त
marathinews24.com
पुणे – पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच पुणे महानगर प्रदेशातील भविष्यातील वाहतुकीचे एकात्मिक नियोजनाच्या अनुषंगाने दीर्घकालीन उपाययोजनांच्या प्रकल्पांवर काम करत असतानाच सध्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या तात्काळ हाती घेता येतील अशा उपाययोजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करावी, असे निर्देश तेली- उगले यांनी दिले.
वाढदिवसानिमित्त ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव – सविस्तर बातमी
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृष्य प्रणालीद्वारे), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त मंजुलक्ष्मी के., पुणे मनपा अपर आयुक्त पवनीत कौर, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त तेली- उगले म्हणाल्या, पुणे शहरात प्रस्तावित बोगदांचे जाळे अर्थात ‘पाताल लोक प्रकल्प’, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर), अंतर्गत वर्तुळाकार मार्ग आदी दीर्घकालीन प्रकल्पांसाठी विशेष प्रयोजन वाहन (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. असे मोठे प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी कालावधी जाणार आहे. या प्रकल्पांचे नियोजन, आरेखन, विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याला गती द्यावी.
दीर्घकालीन प्रकल्पांचा कालावधी पाहता सध्या अस्तिवात असलेल्या वाहतूक पायाभूत सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर व्हावा तसेच क्षमतावाढ व्हावी यासाठी महानगरपालिका, पोलीस, रेल्वे, महामेट्रो, पीएमपीएमएल, एसटी, परिवहन विभाग या विभागांची उपसमिती स्थापन करून विचार विनिमय करावा व त्याबाबतचे सादरीकरण प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
मेट्रो, रेल्वे आदी सेवांचा पूर्ण वापर व्हावा यासाठी शेवटच्या ठिकाणाहून त्यांच्या इच्छित स्थानी जाण्यासाठी प्रवाशांना जोडणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पीएमपीएमल बसेस, रिक्षा थांबे यांची सुविधा त्या त्या ठिकाणी झाली पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
बोगद्यांचे नियोजन करताना त्यात मर्यादीत वाहनांचा समावेश न करता सार्वजनिक वाहतूक वाहनांना प्रवेश मिळाल्यास वाहतूक गतीने होईल, असे हर्डीकर यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांचा समावेश प्राधान्याने प्रकल्पांमध्ये करण्यात यावा. दोन्ही महानगरपालिका तसेच महानगर प्रदेश क्षेत्रात वाहतूक एकात्मिक पद्धतीने गतीमान होईल यासाठी समन्वयाने प्रकल्पांची आखणी व्हावी, असे श्री. चौधरी म्हणाले.
यावेळी पाटील यांनी वाहतूक विभागाबाबत सादरीकरण केले. सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी आपल्याकडील सांख्यिकी माहिती (डेटा) एकमेकांना दिल्यास योग्य वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य पद्धतीने काम होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
पुणे रेल्वे स्टेशन येथे नवीन 6 रेल्वे फलाट करण्यासह अस्तित्वात असलेल्या 6 फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्यावतीने सादरीकरणात देण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, रेल्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नगररचना, वाहतूक व परिवहन विभागाचे अधिकारी, मोनार्च कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.




















