जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत पूर्व-विवाह समुपदेशन कार्यक्रम संपन्न
marathinews24.com
पुणे – दृढ आणि समाधानी वैवाहिक आयुष्याची सुरुवात ही योग्य मार्गदर्शन आणि पारदर्शक संवादातून होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून तरुणांना या दिशा दाखविण्याचे काम करण्यात येत आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी केले.
तरुणांना पूर्व-विवाह सशक्त मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा पाया मजबूत व्हावा या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने गणेश क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे पूर्व-विवाह समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नामदेव समाजउन्नती परिषद, पुणे शहर यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमाला १ हजार ६०० हून अधिक युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील म्हणाल्या, पूर्व-विवाह समुपदेशन उपक्रम म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची दिशा आहे. समाजातील अधिकाधिक तरुणांपर्यंत हे मार्गदर्शन पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. नामदेव समाजउन्नती परिषदेच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला, याबद्दल त्याचे श्रीमती पाटील यांनी आभार मानले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जनजागृती, समुपदेशकांचे नियोजन, कार्यक्रम स्थळ व्यवस्थापन, सहभागी तरुणांचे समायोजन आणि कार्यक्रमातील गुणवत्तेची खात्री आदी बाबीवर भर दिला.
प्री-मॅरिटल कौन्सेलिंग म्हणजे काय?
प्री-मॅरिटल कौन्सेलिंग म्हणजे विवाह-पूर्व जोडप्यांनी प्रशिक्षित समुपदेशकासोबत संवाद साधून परस्पर समज, संवाद कौशल्य, मतभेदांचे निराकरण, आर्थिक नियोजन, भावनिक समज आणि कुटुंब नियोजन या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन घेणे. या समुपदेशनातून नात्यात पारदर्शकता, विश्वास व परस्पर समज वाढवण्यास मदत होते.
युवा पिढीसाठी का आवश्यक आहे?
आजच्या तरुण पिढीसमोर करिअर, ताणतणाव, अपेक्षा आणि नात्यांतील गुंतागुंत यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे विवाहपूर्व समुपदेशन त्यांना स्वतःला आणि आपल्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी, वास्तववादी अपेक्षा ठेण्यासाठी आणि यशस्वी वैवाहिक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेच्या समुपदेशन केंद्रात मोफत सेवा उपलब्ध
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या समुपदेशन केंद्रात युवक-युवतींसाठी मोफत पूर्व-विवाह समुपदेशन सेवा उपलब्ध असून, ही सेवा सर्वांसाठी खुली आहे. विशेषतः ज्यांना विवाहपूर्व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, अशा सर्वांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या केंद्रावर प्रशिक्षित समुपदेशकांच्या मार्गदर्शनाखाली संवाद, समज आणि विश्वास या गोष्टींवर भर दिला जातो.