कोंढाव्यात तृतीयपंथीयाकडून कबुतराला मारताना गोळी चुकली
marathinews24.com
पुणे – कबुरतराला मारत असताना तृतीयपंथीयाकडून एअर गनमधून मिस फायर होऊन छरे समोरच्या बंगल्यातील काचेला लागले. त्यामुळे बंगल्यात राहणाऱ्यांचा गोळीबार झाल्याचा गैरसमज झाल्याने त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नेमका याच वेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा संबंधीत पोलीस ठाण्याच्या हद्दीत होता. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती. मात्र, कोंढवा पोलिसांकडून तपासाअंती सर्व काही उघड झाले.
पाचव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजूर ठार – सविस्तर बातमी
बिलाल झुल्फिकार शेख ( २९, शालिनी पॅलेस सोसायटी, साळुंके विहार, कोंढवा ) असे चौकशी करण्यात आलेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. त्याच्याकडे एअर गन १७७ आहे. तो दुपारच्या वेळी टेरेसवर कबुतरांना एअरगनमधून छरे मारत होता. तेव्हा मिस फायर होऊन समोरच्या बंगल्यात रहाणाऱ्या कर सल्लागार श्रीकांत कानडे यांच्या खिडकीची काच फुटली . खिडकीची काच फुटून छरे त्यांच्या घरात घुसले. यावेळी घरात तीन व्यक्ती होत्या. त्यांनी छरे बघितल्यावर गोळीबार झाल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिल्यावर तपासाला सुरवात केली. तेव्हा समोरच्या इमारतीत रहाणाऱ्या बिलालकडे एअर गन असल्याचे समजले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने नेम चुकल्याने ही घटना घडल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.