१०० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, धायरीतील सराफी पेढीवरील दरोडा प्रकरण
Marathinews24.com
पुणे – खेळण्यातील नकली पिस्तुलाचा वापर करून सराफी पेढीवर दरोडा टाकून तब्बल २० लाखांचे २२ तोळे सोने घेऊन पसार झालेल्या दरोडेखोरांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. ही घटना मंगळवारी भरदुपारी सिंहगड रस्त्यावर धायरीतील रायकर मळा याठिकाणी घडली होती. संबंधित ठिकाणी काळुबाई चौकात श्री ज्वेलर्स नावाचे सराफी पेढी आहे. दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगार दुकानात होते. त्यावेळी दुपारी दुकानात वर्दळ कमी असताना, एक अनोळखी व्यक्ती दुकानात तोडांला मास्क लाऊन शिरला. त्याने सोनसाखळी दाखवा असे दुकान मालकास सांगितले. त्यानंतर दुकान मालक सोनसाखळी दाखवत असतानाच, आणखी दोनजण दुकानात शिरले. त्यांनी दुकानात शिरताच, पिस्तुलचा धाक दाखवून दुकान मालक व कामगारास धमकावून दरोडा टाकला होता.
तिघा दरोडेखोरांनी दुकानातील २२ तोळे दागिने पिशवीत टाकून पळून जात असताना कर्मचार्यांशी झटापट झाली. झटापटीत त्यांच्या हातातील पिस्तुल तुटुन खाली पडले. काही कळण्याच्या आतच चोरटे दुचाकीवररून पळून गेले. दरोड्याच्या प्रकारानंतर स्थानिक पोलिसांची पथके व गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक सीसीटिव्हींची तपासणी पोलिसांनी केली आहे. आरोपी ज्या दिशने पळाले त्या रस्त्यावरील सर्व सीसीटिव्हींची तपासणी करण्यात येत आहे. दरोडेखोरांनी त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी एका ठिकाणी सोडून ते दुसर्या वाहनाने पुढे पलायन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासून आरोपींचा माग काढला जात आहे. दुकानाशी संबंधीत ग्राहकाचा, कर्मचार्यांचा या प्रकारात हात आहे का ? या दृष्टीने देखील तपास करण्यात येत आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांना आरोपींचा माग काढणे सुरू असल्याचे सांगितले.