शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच जबाबदार धरले जाणार -पोलीस आयुक्त अमितेश कुमार
marathinews24.com
पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवणे आमच्यासाठी महत्वाचे असून, त्यादृष्टीने वेळोवेळी प्राधान्य दिले जात आहे. मात्र, काही दिवसांपासून हॉटेल व्यावसायिक, पब चालकांसह इतर आस्थापना वेळेच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आले आहे. नियमानुसार संबंधित आस्थापना व्यावसायिकांनी रात्री दीड वाजेपर्यंत बंधन पाळणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेनंतरही व्यवसाय करणार्याना पाठबळ दिल्याप्रकरणी आता थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच जबाबदार धरले जाणार आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
पबसह हॉटेल व्यावसायिकांची मुजोरी वाढल्यामुळे टवाळखोरांचेही फावले असल्याचे दिसून आले आहे. रात्री दोन ते तीन वाजेपर्यत आस्थापना उघड्या ठेउन सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात आहे. मात्र, तरीही संबंधित हद्दीतील ठाणे प्रमुखांकडून संबंधिताना व्यावसायासाठी मुकसमंतीची मुभाच दिली जात आहे. त्यामुळे हे जर थांबले नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याप्रकरणी जबाबदार धरले जाणार आहे. त्यासोबतच अवैध धंदे चालकांविरूद्धही ठाणे प्रमुखांनी वेळोवेळी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. जर वेळेचे उल्लंन करीत आस्थापना सुरू राहिल्यास कोणत्याही ठाणे प्रमुखाचा मुलाहिजा ठेवणार नाही. त्यांच्याविरूद्ध थेट कारवाईचा बडगा उगारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नवीन वसुली बहाद्दर रडारवर, यादी बनविण्याचे काम तत्परतेने
पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसुली करणार्या स्पेशल ६५ वसुली बहाद्दरांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा दणका दिला होता. मात्र, आता बहुतांश पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन वसुली बहाद्दर तयार झाले आहेत. त्यांच्याकडून छुप्या पद्धतीने अवैध धंदेवाईकांना पाठबळ देउन वसुली केली जात आहे. त्यासोबतच स्पा, मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेटही चालविण्यात येत असल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर आता नव्याने तयार झालेल्या वसुली बहाद्दरांनाही दणका दिला जाणार आहे. त्यांची यादी बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
न्यायालयासह शासनाच्या नियमाप्रमाणे हॉटेल, पबसह इतर आस्थापना व्यवसाय वेळेत बंद होणे अपेक्षित आहे. मात्र, काही जणांकडून गैरफायदा घेत नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे प्रत्येक ठाणे प्रमुखांनी अशाप्रकारे आस्थापन चालकांकडून कृत्य आपल्या हद्दीत होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधिताला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर