गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट

फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन

marathinews24.com

पुणे – गायन करताना केवळ इतरांचे अनुकरण करून गाणे सादर करणे पुरेसे नसून, गाण्यांतील भाव समजून ते श्रोत्यांच्या मनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य व ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. उपेंद्र भट यांनी केले.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडली सिंगापूर शैक्षणिक सफर – सविस्तर बातमी

सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित २४ व्या ‘पुणे आयडॉल’ गायन स्पर्धेचे उद्घाटन पं. उपेंद्र भट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. ही स्पर्धा दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सुरू झाली आहे. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, सोमेश्वर फाउंडेशच्या अध्यक्षा तसेच माजी नगरसेविका स्वाती निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, नगरसेविका सपना छाजेड,नगरसेविका मयुरी कोकाटे,बिपिन मोदी ,वसंतराव जुनवणे, ज्ञानेश्वर मुरकुटे, तसेच स्पर्धेचे परीक्षक जितेंद्र भूरूक व मनीषा निश्चल आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना पं. उपेंद्र भट म्हणाले की, गायन ही परिवर्तन घडवणारी प्रभावी कला असून त्यामध्ये अर्थपूर्णता असणे आवश्यक आहे. केवळ हौस म्हणून गाणाऱ्यांनीही शास्त्रीय गायकीचा भक्कम पाया आत्मसात करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी पं. भीमसेन जोशी, किशोर कुमार, मोहम्मद रफी, आशा भोसले व लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ‘रस बरसत अमृत वेणा’ हे युगुलगीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या संगीतप्रेमाच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, संगीत ही समाजात सकारात्मक बदल घडवणारी कला आहे. प्रत्येकाने व्यावसायिक गायक होणे शक्य नसले तरी गायनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. “शंभर भाषणांपेक्षा एक गाणे अधिक प्रभावी ठरते,” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांनी अधोरेखित केला.

प्रास्ताविकात स्वाती निम्हण यांनी सांगितले की, ‘पुणे आयडॉल’ स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भविष्यात ही स्पर्धा ‘महाराष्ट्र आयडॉल’ म्हणून विस्तारेल, असा विश्वास आहे. ही स्पर्धा नवोदित गायकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या स्पर्धेत मृणाल देशपांडे (वय ४) आणि अमर गोसावी (वय ८०) यांचा सहभाग विशेष ठरला आहे. नागपूर, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर व मुंबई आदी भागांतून एकूण ५६० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. तीन दिवस प्राथमिक फेरी पार पडणार असून त्यानंतर अंतिम फेरी आयोजित करण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभात मान्यवरांचे स्वागत उमेश वाघ यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमित मुरकुटे यांनी केले. जितेंद्र भूरूक आणि सपना छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×