खोट्या टास्कच्या भूलथापांना बळी; पावणे नऊ लाखांचे नुकसान
Marathinews24.com
पुणे – ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्याने एकाला तब्बल पावणे नऊ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर ते २३ मार्च कालावधीत सिंहगड रस्ता परिसरात आनंद नगरात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रस्ता परिसरात आनंद नगरात राहायला आहेत. ३१ ऑक्टोबरला सायबर चोरट्याने तक्रारदाराला फोन करून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने गुंतवणूक करण्यात सुरुवात केली. पाच महिन्यात जवळपास पावणे नऊ लाख रुपये गुंतवणूक करूनही सायबर चोरट्याने त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाली असल्याचे दिसून येताच तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे तपास करीत आहेत.