शुश्रृषेसाठी ठेवलेल्या कामगाराने ज्येष्ठाची १४ लाखांची केली फसवणूक
Marathinews24.com
पुणे – शुश्रृषेसाठी असलेल्या कामगाराने ज्येष्ठ नागरिकाची १३ लाख ९२ हजार रुपयांची फसणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल बँकखात्याला असल्याची संधी साधून पोद्दारने बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन खात्यातून पैसे काढून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी कामगाराविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवकुमार पोद्दार (वय २६, रा. बलिया, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने हडपसर पोलिसांनी फिर्याद दिली आहे.
उपाहारगृहातील मॅनेजरनेच ३१ लाखांचा केला अपहार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या शुश्रृषेसाठी सत्यसेवा नर्सिंग सर्व्हिसेसकडून आराेपी पोद्दार याला ज्येष्ठ नागरिकाची शुश्रृषा करण्यासाठी ठेवण्यात आले होते. वर्षभरापासून तो तक्रारदाराच्या वडिलांची शुश्रृषा करत होता. ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडला होता. पोद्दारने बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन खात्यातून वेळोवेळी १३ लाख ९२ हजार रुपये स्वत:च्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.