याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – तरुणाचा डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना रविवारी दुपारी कोंढव्यातील ज्योती हॉटेल चौकातील मोकळ्या जागेत उघडकीस आली. रघुनाथ रघुवीर परदेशी (वय ३०, रा. बोपोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खूनामागचे कारण समजू शकले नाही.
थार वाहन चालकाचा थरार, ५ दुचाकींना दिली धडक – सविस्तर बातमी
कोंढव्यातील ज्योती हॉटेलजवळील मोकळ्या जागेच तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती रविवारी दुपारी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरुन पोलिसांनी ओळख पटविली. परदेशी हा मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत राहायला होता. तो कोंढव्यात कशासाठी आला होता, त्याच्या खुनामागचे कारण काय आहे? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.