शेतकऱ्यांना “फार्मर आयडी” काढणे बंधनकारक
marathinews24.com
पुणे – राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ‘अँग्रीस्टॅक’ योजना राबविण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) काढल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
मान्सूनपुर्व कामे वेळेत पुर्ण करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश – सविस्तर बातमी
अँग्रीस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाई, पीक कर्ज आदी विविध योजनांचा थेट लाभ मिळणार असून डिजिटल पद्धतीने जमीन नोंदीमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. या योजने अंतर्गत सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे.
पीएम किसानच्या लाभार्थीपैकी ८७ हजार शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्रिस्टॅक नोंदणी केलेली नाही. उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी न केल्यास त्यांना पीएम किसान योजनेचा व कृषी विभागाच्या इतर योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येईल. अडचण येवू नये म्हणून शेतकऱ्यांनी तात्काळ पोर्टलवर नोंदणी करावी.
ॲग्रिस्टॅक योजनेच्या नोंदणीसाठी सातबारा, आधार कार्ड हे कागदपत्रे आणि आधार कार्ड लिंक असलेला दूरध्वनी क्रमांक आवश्यक आहे. ॲग्रिस्टॅक योजनेच्या नोंदणीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्राशी तसेच संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक, ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. तसेच शेतकरी स्वतः https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या लिंकवर जाऊन ॲग्रिस्टॅक नोंदणी करू शकतात. कुटुंबातील प्रत्येक सातबारा धारक सदस्यांनी यामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे, असेही काचोळे यांनी केले आहे.