Breking News
पुण्यातील अनेकांची बँकखाती पोलिसांच्या रडारवरपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगेकृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटनदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण मोहीमेअंतर्गत साडेसात हजार वृक्ष लागवडीचा संकल्पराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरावाहने चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ४ गाड्या जप्तबिटवाईज–मर्सिडीज बेंझ परिसरात उड्डाणपुलाची मागणीAjit Pawar : कष्टकर्‍यांच्या वेदनेने कळवळणारा पहाड..!दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादनविवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

Ajit Pawar : कष्टकर्‍यांच्या वेदनेने कळवळणारा पहाड..!

Ajit Pawar

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त स्वीय सहायकने मोकळे केले मन

marathinews24.com

पुणे –  आदरणीय अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे व्यक्तिमत्त्व कणखर होते. ते अत्यंत स्पष्टवक्ते आणि फटकळ म्हणूनही लोकांना माहिती होते. जे पटणार नाही, समोर काही चुकीचे दिसले, की जाग्यावर सुनावण्याचा स्वभाव सर्वपरिचित होता. ते जेवढे कठोर होते तेवढेच ते हळवे, संवेदनशील आणि कणवाळू देखील होते. अर्थात आपल्या या स्वभावाचे प्रदर्शन त्यांनी जाणीवपूर्वक कधीच केले नाही. माध्यमे किंवा जनतेसमोर त्यांनी स्वतःचा हा स्वभाव कधीच ’कॅश’ केला नाही. कारण अजितदादा हे एक अस्सल आणि लोकाभिमुख नेते होते. लोकांसमोर न आलेली, मीडियात न वाजवली गेलेली त्यांची अशी अनेक स्वभाववैशिष्ट्ये आता क्षणोक्षणी आठवतात.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे अभिवादन – सविस्तर बातमी 

2017 सालातील ही गोष्ट. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले अजितदादा चांदा ते बांदा संघर्षयात्रेत अग्रभागी होते. त्या संघर्षयात्रेच्या निमित्ताने उभा महाराष्ट्र पिंजून काढताना त्यांच्यातील ऊर्जा अधिकच उसळून येत होती. महाराष्ट्र ढवळून काढणार्‍या त्या संघर्षयात्रेचे ते जणू ऊर्जास्रोतच बनले होते. त्या संघर्षयात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, जोगेंद्र कवाडे यांच्यापासून ते अगदी जयकुमार गोरे यांच्यापर्यंत महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय अनेक ज्येष्ठ, तरुण नेते सहभागी झाले होते.

संघर्षयात्रेला सुरुवात झाली आणि दिवसेंदिवस मोठ्या प्रतिसादात ही यात्रा महाराष्ट्र पादाक्रांत करू लागली. या यात्रेने महाराष्ट्र दणाणून सोडला होता. ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून अजितदादा परिसरातील गावात जाऊन स्थानिक लोकांशी संवाद साधायचे. सर्वसामान्य लोकांशी संवाद हा त्यांचा एकप्रकारे ऑक्सिजनच होता. आणि, सर्वसामान्य जनतेशी संवाद साधणे हा त्यांच्या आनंदाचा भाग होता.

एके भल्या सकाळी अजितदादा (Ajit Pawar) आम्हा काही मोजक्या लोकांना सोबत घेऊन औसा तालुक्यातील एका गावात गेले. अवघ्या काही दिवसांपूर्वी त्या गावात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ यामुळे नुकसान झाले होते. ती पाहणी करताना एका पडझड झालेल्या घरासमोर आम्ही आलो. त्या ठिकाणी एक तरुण शेतकरी तीन दगडांच्या चुलीवर भाकरी करताना दिसला. समोर पडलेले साधे कुडाचे, पत्र्याचे घर. त्यासमोर दगडाच्या चुलीवर भाकरी करत असलेला तो तरुण पाहून अजितदादा त्याच्यापाशी गेले. त्याच्याशी बोलताना समजले की, पाऊस आणि वादळामुळे त्याच्या घराची पडझड झाली. त्यामध्ये त्याची पत्नी जखमी झाली. ती हॉस्पिटलमध्ये असल्याने भाकरी करण्याचे काम याला करावे लागत आहे. अजितदादांनी विचारले, तुझी बायको कोणत्या हॉस्पिटलमध्ये डमिट आहे? त्यावर त्याने सांगितले, की सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये डमिट आहे. त्यावर दादांना मी सांगितले, की दादा मला ते हॉस्पिटल माहिती आहे. त्यावर दादांनी त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी बोलून घ्यायला सांगितले. तसेच आम्ही लवकरच सोलापूरला जाणार होतो तर तिथे गेल्यावर हॉस्पिटलमध्ये आपण जाऊया असेही सांगितले. त्या तरुण शेतकर्‍याची विचारपूस करून, काळजी करू नकोस आम्ही आहोत, असा त्याला दिलासा, धीर देऊन दादा तिथून निघाले आणि संघर्षयात्रेत सहभागी झाले.

पुढे दोनेक दिवसांतच आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलो. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर सर्व वर्तमानपत्रे मी दादांच्या समोर ठेवली. सकाळी सहा वाजता दादांना समोर सर्व वर्तमानपत्रे हवी असायची. मी जेव्हा सोबत असे तेव्हा ती व्यवस्था मी पहाटे पाच वाजताच लावायचो. महाराष्ट्रात जिथे कुठे असू तिथल्या बसस्थानकावर माणूस पाठवून पहाटेच सर्व वर्तमानपत्रे मागवून सहाच्या आत दादांसमोर हजर करायचो. तर वर्तमानपत्रे समोर ठेवताच दादा म्हणाले, मुसळे, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे. खरं तर मीच त्यांना त्याबाबत आठवण करणार होतो. मात्र त्याआधीच त्यांनी अगदी जाणीवपूर्वक लक्षात ठेवून मला सांगितले. थोड्याच वेळात आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो.

औसा तालुक्यातील त्या जखमी महिलेस दादा भेटले. तिची ती अवस्था पाहून दादा फारच अस्वस्थ झाले. कारण, त्या महिलेची 3 बोटे अक्षरशः कापून निघाली होती. दादा तिला म्हणाले, अशी कशी बोटे कापली तुझी? त्यावर ती महिला म्हणाली, घरावरचा पत्र उडून निघालं होतं. ते पत्र सावरताना बोटे कापली. दादा उसळून म्हणाले, अगं एवढं काय त्या पत्र्यापाशी ठेवलं होतं. हाताची बोटे निकामी होईपर्यंत एवढी का झुंजलीस? ते पत्रे गेले असते तर तुला नवे मिळाले असते. त्यावर ती महिला म्हणाली, आवं तेच पत्रं घरावर टाकायसाठी दोन वर्ष राबलो. दोन वर्ष पै-पै साठवून टाटाची पत्रं आणली आणि घर झाकले. डोळ्यांसमोर ते असं कसं उडून जाताना पाहू? त्या महिलेच्या बोटांची अवस्था पाहून आधीच अस्वस्थ झालेल्या दादांना गहिवरच दाटून आला. याच कष्टकरी, वंचित शेतकर्‍यांसाठी संघर्षयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गरजणारा तो संघर्षयोद्धा गलबलून गेला. त्यांनी थोरल्या भावाप्रमाणे त्या महिलेला धीर दिला. म्हणाले, काळजी करू नकोस मी आहे.

केवळ शाब्दिक धीर देऊन दादा तेथून निघून गेले नाहीत. तर जाग्यावरच त्या महिलेला आर्थिक मदत केली. त्यावेळी खिशात रोख पैसे नव्हते तर चेक दिला. हॉस्पिटलची सारी व्यवस्था लावली. डॉक्टरांशी बोलले. यावेळी आमच्यासोबत पक्षाचे तत्कालीन सोलापूर शहर अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष भारत जाधव आणि काही मोजकीच मंडळी होती. ती सारी मंडळी देखील अजितदादांचे हे संवेदनशील रूप पाहून थक्क झाली होती.

उपेक्षित, वंचितांच्या जखमा, वेदना पाहून अजितदादा कळवळून जायचे ते असे. अशा असंख्य प्रसंगाचा मी स्वतः साक्षीदार राहिलो आहे. जनतेचे दुःख पाहून ते फक्त कळवळायचे नाहीत तर ते दूर करण्यासाठी आयुष्यभर एका पहाडाप्रमाणे भक्कमपणे उभे राहिले. ऊन, पाऊस, वारा एवढेच काय तर स्वतःच्या प्रकृतीचीही त्यांनी त्यासाठी कधी काळजी केली नाही. सार्वजनिक कामाचे वेड लागलेला हा नेता होता. त्या वेडातूनच पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत धावण्यास, राबण्यास, अफाट कष्ट उपसण्यास त्यांनी किंचितशी कसर ठेवली नाही. या धावपळीत कधी कधी सारा दिवस त्यांनी एखाद्या फळावर किंवा रसावर काढला आहे. एवढा तहान-भूक हरपून हा माणूस जनतेसाठी झिजला आहे.

मी आधीही सांगितले, की अजितदादा (Ajit Pawar) हे अस्सल मातीतील नेते होते. पंचतारांकित वातावरणापेक्षा ते कायम सर्वसामान्य जनतेत विशेष रमले. विशेषतः शेतकरी, ग्रामीण जनता ही त्यांची हक्काची ठिकाणे होती. तिथंच त्यांना त्यांची मुळे गवसायची. त्यामुळेच त्यांच्या लेखी अग्रक्रम होता तो अशा लोकांना.

याबाबतची आणखी एक आठवण इथं सांगायला हवी. ती देखील संघर्षयात्रेतीलच आहे. तेव्हा आम्ही छ. संभाजीनगर जिल्ह्यात होतो. एका स्थानिक नेत्याने दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. दरम्यान, एका सामाजिक कार्यकर्त्याने अजितदादांची भेट घेऊन सांगितले, की दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अन्नछत्र चालवत आहोत. इथून जवळच आहे. तुम्ही तिथे भेट द्याल का? अजितदादांनी क्षणाचाही विचार न करता सांगितले, की नुसती भेट कशाला? आम्ही जेवायलाच येतो की तिथे. सर्व विद्यार्थ्यांसोबत जेवण करू. दहा-पंधरा माणसांची जादाची व्यवस्था होईल ना? आश्चर्यचकित झालेल्या त्या कार्यकर्त्याने आनंदाने होकार दिला. ज्या नेत्याने दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती त्याची समजूत काढून दादा दुष्काळी विद्यार्थ्यांसोबत जेवायला निघाले.

त्या ठिकाणी जाताना दादांनी पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, राजेश टोपे, जयकुमार गोरे अशा सर्वांना हाक मारून सोबत नेले. विद्यार्थी, विद्यार्थिनींना शेजारी बसवून जमिनीवर मांडी घालून जेवण केले. अजितदादांची ही कृती देखील स्थानिक कार्यकर्ते, जनतेला आश्चर्यचकित करणारी होती. नव्याने पाहणार्‍यांना हे विशेष वाटले असावे, किंवा हे वाचून देखील काहींना विशेष वाटेल. दादांच्या दृष्टीने मात्र ही सर्वसामान्य बाब होती. अगदी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याच्या घरी, त्याच्या कार्यक्रमात पंगतीला पत्रावळीत जेवण्यात दादांना आनंदच वाटत असे. अगदी ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यात कधी खंड पडला नाही.

अगदी काही दिवसांपूर्वी आमदार सुनील शेळके यांनी भव्य सप्ताहाचे आयोजन केले होते. त्या सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला दादा गेले होते. तेव्हाही महाप्रसाद सुरू झाल्यानंतर सर्व भाविकांसोबत जमिनीवर बसून पत्रावळीवर *जेवणाचा* आनंद त्यांनी घेतला. त्यावेळी मीडिया होता म्हणून ती बातमी फ्लॅश झाली. दादांसाठी मात्र ती सहज बाब होती. त्याचे कारण म्हणजे हा माणूसच अस्सल मातीतील होता.

अजितदादा पवार यांनी देहाचा कण आणि कण, आयुष्याचा क्षण आणि क्षण सार्वजनिक सेवेसाठी कारणी लावला. त्यांच्या कार्याचे, कर्तबगारीचे मोजमाप करणारी मोजपट्टी अजून कुठेही तयार झाली नाही. हा नेता जेवढा कणखर होता त्यापेक्षा अधिक तो मायाळू, कणवाळू होता. ती माया अप्रत्यक्षरीत्याही लाखो जणांना लाभली. प्रत्यक्ष ज्यांना लाभली, ज्यांनी ती अनुभवली ते तर अजितदादांच्या जाण्याने अश्रू ढाळत आहेतच शिवाय ज्यांनी कधीच दादांना पाहिले नाही अशाही लोकांचे डोळे अजितदादा पवार या व्यक्तीसाठी वहावेत ही काही सामान्य गोष्ट म्हणता येणार नाही. अजितदादा मोठेच होते. मात्र ते गेल्यानंतर त्यांचे ते मोठेपण अधिक उत्तुंग झाले आहे.

सर्व स्तरातील घटकांपासून अगदी सामाजिक घटकातील शेवटच्या बिंदूवरील उपेक्षित वंचितासाठी अजितदादा हा हक्काचा आधार होते. ओळख असो वा नसो अजितदादांकडे गेले की आपले काम होईल, असा विश्वास त्या प्रत्येकाला होता. त्या अर्थाने अजितदादा लोकांना हक्काचा आधार वाटायचे. तो आधार आता नाही, ही जाणीव माझ्यासह असंख्य लोकांचे काळीज कुरतडून टाकत आहे.

(लेखक-सुनीलकुमार मुसळे, स्वीय सहायक, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×