ऍम्ब्युलन्सच्या धडकेने महिलेच्या मनगटाची हाडे मोडली
marathinews24.com
पुणे – भरधाव रुग्णवाहिका चालकाने मोबाईलवर बोलत असताना धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार महिलेची मनगटाची हाडे मोडली आहेत. हा अपघात १ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूडमधील पौड रस्त्यावर घडली आहे. निष्काळजी ऍम्ब्युलन्स चालकाने सिग्नल तोडून भरधाव वेगात वाहन चालवत दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली. अपघातात पल्लवी अभिजीत गायकवाड गंभीर जखमी झाल्या आहेत.
येरवाड्यात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय कार्यान्वित – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या पल्लवी गायकवाड मुलीला क्लासला सोडून नातेवाईकांच्या घरी जात होत्या. आयडियल कॉलनीजवळील सिग्नल ओलांडताना, हरिश मधुकर पाचपोर या ऍम्ब्युलन्स चालकाने मोबाईलवर बोलत असतानाच सिग्नल तोडून त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की पल्लवी गायकवाड स्कूटीसह रस्त्यावर फेकल्या गेल्या. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना जवळील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीत त्यांच्या मनगटाच्या हाडामध्ये फ्रॅक्चर आढळून आले आहे.
रुग्णवाहिका चालकाने मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे वाहन चालवले. अपघातात त्यांना शारीरिक इजा झाल्याशिवाय त्यांच्या स्कूटीचेही मोठे नुकसान झाले असून साइड पॅनल, लॉक आणि इंडिकेटर तुटले आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८४, १७७, २३९ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२५(अ), १२५(ब), २८१ आणि ३२४(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.