एटीएमधून ५० हजारांची रोकड काढून फसवणूक
marathinews24.com
पुणे– एटीएमधून रोकड काढणार्या ज्येष्ठ नागरिकाला मदतीच्या बहाण्याने चोरट्याने गंडा घातला आहे. चोरट्याने जेष्ठाकडून पीनक्रमांक जाणून घेतल्यांनतर त्यांना एटीएम कार्ड बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर हातचलाखीने स्वतःकडील दुसरेच कार्ड देउन काही वेळानंतर एटीएम सेंटरमधून ५० हजार रुपये काढून घेत फसवणूक केली आहे. फसवणूकीची घटना नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कारचालकाच्या धडकेत ज्येष्ठ दुचाकीस्वार ठार – सविस्तर बातमी
तक्रारदार ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक धनकवडी भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १८ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास ते नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर असलेल्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ चोरटा एटीएम सेंटरमध्ये शिरला. त्याने जेष्ठाला एटीएममधून पैसे काढण्यास मदत करतो, अशी बतावणी करीत कार्ड स्वतःकडे घेतले. त्यानंतर एटीएम वापराचा सांकेतिक शब्द चोरट्याने त्यांच्याकडून घेतला. मशीनमधून पैसे निघत नाहीत, अशी बतावणी करीत त्याच्याकडील एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवले. स्वतःचे बंद पडलेले एटीएम जेष्ठाला दिले.
पैसे न मिळाल्याने जेष्ठ नागरिक एटीएम सेंटरमधून बाहेर पडले. त्यानंतर ज्येष्ठाकडून घेतलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करुन चोरट्याने खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. खात्यातून पैसे काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जेष्ठाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे तपास करत आहेत. दरम्यान, एटीएममधून पैसे काढणार्या ज्येष्ठांकडील रोकड चोरणार्या कर्नाटकातील चोरट्याला पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. चोरट्याने पुणे शहर परिसरात एटीएममधून रोकड काढणार्या ज्येष्ठांकडील रोकड चोरून नेण्याचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.