हिंगणघाट बाजार समिती राज्यात प्रथम; बारामती तिसऱ्या स्थानी
marathinews24.com
पुणे- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची आणि ६८ खाजगी बाजारांची सन २०२३-२४ या वर्षाच्या कामगिरीवर आधारित वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर केली आहे. क्रमवारीनुसार राज्यातील १० बाजार समित्यांमध्ये पुणे विभागातील बारामती बाजार समितीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन – सविस्तर बातमी
बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीनुसार राज्यात पहिल्या १० बाजार समित्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समिती १७८ गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड बाजार समिती १७१.५ गुणांसह दुसऱ्या स्थानी, बारामती १६५ गुणांसह तिसऱ्या स्थानी, १५५.५ गुणासह पंढरपूर पाचव्या तर १४९ गुण मिळवून अकलूज आठव्या स्थानावर आहे. तसेच राज्यातील सहकार विभागाच्या रचनेनुसार विभागातील बारामती, पंढरपूर व अकलूज हे अनुक्रमे पहिल्या तीन स्थानावर आहेत.
बाजार समित्यांची तसेच खाजगी बाजारांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालयाकडून जागतिक बँकेच्या सुचनेनुसार शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्र म राबविण्यातील सहभाग यानुसार ३५ निकष तयार करण्यात आले होते. बाजार समित्यांच्या निकषासाठी २०० गुण व खाजगी बाजारांसाठी २५० गुण निश्चित करण्यात आले होते.
क्रमवारीमुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये तसेच खाजगी बाजारांमध्ये आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा निर्माण होण्यास चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्यांनी अधिक जोमाने कामकाज करावे, असे आवाहन पणन संचालक विकास रसाळ यांनी केले आहे.