खरीप हंगामात डिएपीऐवजी पर्यायी खतांचा वापर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
marathinews24.com
पुणे – खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून डिएपी खताची अधिक मागणी आहे. डिएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. डिएपी खताची कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी खत वापरण्याचे कृषी विभागाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
स्फुरदयुक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद 16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे.
एसएसपी बरोबरच संयुक्त खते त्यामध्ये एनपीके 10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 व एनपीके 15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य देखील पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खताचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो.
त्याचबरोबर टिएसपी (ट्रिपल सुपर फॉस्पेट) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डिएपी खतास उत्तम पर्याय आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.