वानवडी पोलिसांकडून आरोपीला बेड्या, १३ लाख ७७ हजारांचा ऐवज जप्त
Marathinews24.com
पुणे – ऑनलाईन जुगारात लाखो रूपये गमाविल्यानंतर हिंदुस्थानातील सैन्य दलातील शिपायाने चक्क दरोडा घालून लाखो रूपये लुटले. वानवडी पोलिसांनी त्याला अटक करीत तब्बल १३ लाख ७७ हजारांचे दागिने जप्त केले. न्यायालयाने संबंधित आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमरजित बिनोदकुमार शर्मा (वय ३० नोकरी-भारतीय सशस्त्र सेना-थल सेना, शिपाई, रा. गाव बघेड, जि. हमीरपुर, हिमाचल प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दनाजयाँ वादिवेल्लु (वय ३५) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
कमांड हॉस्पीटल परिसरातील शासकिय निवासस्थानातुन चोरट्याने घरफोडी करीत दागिने चोरल्याची घटना ७ मार्चला घडली होती. सैन्य दलात हवालदार असलेल्या दनाजयाँ वादिवेल्लु यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वानवडी पोलिसांनी कॅन्टोमेंट, कोंढवा, गोळीबार मैदान, स्वारगेट, मंगळवार पेठ, खडकी, बंडगार्डन, पुणे स्टेशन, विमाननगर अशा २० किलोमीटर अंतरावरील १२० पेक्षा जास्त सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. संशयित आरोपी पुणे स्टेशनजवळील शेठ मोरारजी गोकुळदास सॅनेटोरियम आणि धर्मशाळा लॉजवर थांबलेला उघडकीस आले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे घरफोडी अमरजित शर्मा याने केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी शर्मा हा बंगलोरात असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विष्णु सुतार यांना मिळाली.
आरोपीचा माग काढण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार यतीन भोसले यांनी बंगलोरमध्ये धाव घेतली. त्यावेळी आरोपीचे लोकेशन कोल्हापुरच्या दिशेने जाताना मिळाले. पथकाने पाठलाग करुन शर्माला खंडाळा (सातारा ) परिसरात ताब्यात घेतले. त्याच्याकडे २३ हजारांची रोकड, चार मोबाइल, आर्मीचे ओळखपत्र, कटावणी असा ऐवज मिळून आला. ऑनलाईन जुगारामध्ये नुकसान झाल्यामुळे तो राजस्थानातून नोकरीवरुन पळुन आला. अहिल्यानगर आर्मी हेडक्वॉटरमध्ये जाताना पैशांची गरज पडल्यामुळे त्याने आर्मीचे कार्ड वापरुन वानवडी आर्मी परिसरात प्रवेश मिळविला. त्यानंतर हवालदाराच्या घरी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.
ओळखपत्र दाखवून सराफांना विकले दागिने
चोरीचे दागिने आरोपी शर्माने हडपसरमधील करण सत्यप्रकाश डागर (वय २८) याला विक्री केले होते. पोलिसांनी डागरला अटक करीत त्याच्याकडून ११२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. त्यानंतर आरोपी शर्मा हिमाचलमध्ये घरी जाताना, त्याने दिल्लीतील सोनाराकडे जाऊन आर्मीचे ओळखपत्र दाखविले. मी आर्मीवाला असुन, पैशाची गरज असल्याचे सांगून सोने गहाण ठेउन पैसे नेले. पथकाने दिल्लीत जाउन ५० ग्रॅम सोने जप्त केले. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, उपनिरीक्षक धनाजी टोणे, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, गोपाळ मदने, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे यांनी ही कामगिरी केली.