तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह चौघांवर गुन्हा
marathinews24.com
पुणे – वाघोलीतील तब्बल १० एकर जमीन हडपण्याच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून फौजदारी स्वरूपाचा बनाव रचत, बनावट महिलेला मूळ मालक असल्याचे भासवून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकरणाचा संबंध पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाशीही असल्याची माहिती समोर आली आहे.
भरधाव फॉर्च्युनर चालकाने दुचाकीस्वार तरुण वकीलाला चिरडले – सविस्तर बातमी
आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे आणि अपर्णा यशपाल वर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशेष तपास पथकाने चौकशी सुरू केली आहे. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी इतर साथीदारांच्या मदतीने १० एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली असून, थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी लक्ष घातले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.