स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती टिळक रस्त्यावर हिराबाग चौकाजवळ झाडाला बांधलेली केबल बुलेटमध्ये अडकून झालेल्या अपघातामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी अरविंद पाटील जखमी झाले. त्यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अरविंद पाटील (वय ६८, रा. बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धोकादायक पद्धतीने झाडावर केबल लोंबकळत ठेवणारा व्यक्ती, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय, निमशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पाटील हे पुणे पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त होते. पुणे पोलीस दलात ते उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले होते. सेवा कालावधीत त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते.
किरकोळ वादातून तरुणाचा गळा चिरण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील आणि त्यांचे मित्र सोमवारी (१४ एप्रिल) सकाळी नेहमीप्रमाणे सारसबागे जवळील उपाहारगृहात गेले होते. तेथून ते सकाळी सव्वादहाच्या सुमारास बुलेटवरुन घरी जात होते. हिराबाग चौकातील सिग्नल ओलांडून ते स्वारगेटकडे जात होते. अचानक रस्त्याच्या कडेला आलेल्या झाडाला गुंडाळलेली केबल त्यांच्या अंगावर पडून बुलेटच्या चाकात गुंडाळली गेली. पाटील यांचे नियंत्रण सुटून ते फेकले गेले. बुलेट त्यांच्या अंगावर पडली. अपघातामध्ये पाटील यांचा हात, तसेच पायाला दुखापत झाली. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर निवृत्त पोलीस अधिकारी दत्तात्रय टेमघरे तातडीने घटनास्थळी पाेहाेचले. त्यांनी पाटील यांना रुग्णालयात दाखल केले. अपघातामध्ये केबलचा फटका बसल्याने त्यांच्या हाताच्या एका बोटाच्या नसांना गंभीर दुखापत झाली. प्रथमोपचारानंतर पाटील यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रस्त्यावरील झाडावर धोकादायक पद्धतीने केबल लाेंबकळत ठेवणे, तसेच या भागातील जबाबदारी असलेल्या शासकीय, निमशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अपघात झाल्याचे पाटील यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.