फरार आराेपींचा शोधासाठी नवी मुंबईत छापे – ‘डिजिटल’ अटकेच्या भीतीने लाखोंची फसवणूक
marathinews24.com
पुणे – कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना ‘डिजिटल’ अटक करण्याची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणात पसार झालेल्या काॅलसेंटर चालकासह तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी नवी मुंबईत छापे टाकले.
करण शेखावत (रा. अहमदाबाद), संजय मोरे आणि केतन गव्हाणे हे तिघे पसार झाले आहेत.
किरकोळ वादातून सराइतांकडून तरुणावर गोळीबार – मंगळवार पेठेतील घटना; दोघे अटकेत – सविस्तर बातमी
करण शेखावत हा सूत्रधार असल्याचे तपासात उघडकीस आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहे. पसार आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी गुन्हे शाखेच्या युनिट चारकडे सोपविण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने रविवारी नवी मुंबईत छापे टाकले. आराेपी शेखावत, मोरे, गव्हाणे सापडले नाहीत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
खराडी- मुंढवा रस्त्यावरील प्राईड आयकॉन या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर ‘मैग्नटेल बीपीएस ॲण्ड कन्सल्टंट’ या नावाने हे कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमध्ये १२३ कर्मचारी काम करीत होते. त्यांच्याकडे दररोज सुमारे एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता. ‘तुमच्या खात्यातून अमली पदार्थ खरेदी व्यवहार झाले आहेत, तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते, अशी भीती घालून रोज सायबर फसवणुकीच्या माध्यमातून सुमारे ३० ते ४० हजार डॉलर्स (सुमारे ३२ ते ३३ लाख रुपये) अमेरिकन नागरिकांकडून उकळले जात होते. हा पैसा हवालाच्या माध्यमातून देशात येत असल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले. सायबर गुन्हे शाखा, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री तेथे छापा टाकला.
याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. अटक केलेले आरोपी हे गुजरात, राजस्थान या राज्यातील असून बहुतांश कर्मचारी हे परराज्यांतील आहेत. फसवणूक केलेली रक्कम ही हवालामार्फत देशात येत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांशी संपर्क करून त्यांना बँक खात्यांशी संबंधित समस्या किंवा तुमच्या खात्यातून ड्रग्सचे व्यवहार झाले असून तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती घालून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करायचे.
त्यानंतर यांपासून बचावासाठी क्रिप्टो करन्सी किंवा गिफ्ट व्हाउचर्सच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. हे पैसे इंटरनॅशनल हवालाच्या माध्यमातून देशात आणण्यात येत होते. त्यांची महिन्याला ७ ते ८ कोटींची उलाढाल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी ६ ते रात्री २ पर्यंत काम चालायचे. येथून पोलिसांनी ६४ लॅपटॉप, ४१ मोबाइल, ४ राऊटर जप्त केले आहेत. कर्मचाऱ्यांना रोज फोन करण्यासाठी दिली जाणारी एक लाख जणांची यादी नेमकी कुठून आणि कशी येत होती, फसवणुकीनंतर मिळणारे पैसे देशात कसे येत होते, याबाबत गुुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.