बनावट कागदपत्रे सादर करणे भोवले, समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा
marathinews24.com
पुणे – बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी राष्ट्रवादी (अजित पवार गट ) पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बलात्कारातील आरोपी शंतनू कुकडेसोबतचे असलेले कोट्यावधींचे आर्थिक व्यवहार लपविल्याप्रकरणी आणि पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मानकर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
विदेशी तरूणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी शंतनु कुकडे याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याच्या बँक खात्यात तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. कुकडेचा निकटवर्तीय रौनक जैन याच्या बँक खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या बँक खात्यात तब्बल पावणे दोन कोटी रूपये वर्ग झाले होते. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी मानकर यांची नुकतीच चौकशी केली होती. पोलिसांनी मानकर यांना चौकशीसाठी बोलविले होते. मात्र, आमचा एक जमिनीचा व्यवहार रौनक सोबत झाला आहे. त्याची कायदेशीर इसार पावती देखील झाली आहे. कुकडेच्या आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मानकर यांनी त्यावेळी दिले होते.
मानकर यांनी कुकडेसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार झाले नसल्याचे सांगत कागदपत्रे सादर केली होती. पोलिसांनी कागदपत्रांची सत्यता तपासली असता, संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार आता पोलिसांची दिशाभूल करणे, आरोपी कुकडेसोबत कोट्यावधींचे व्यवहार दीपक मानकर यांच्या अंगलट आले आहे. त्यानुसार समर्थ पोलिसांनी मानकरविरुद्ध फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी शंतनू कुकडेवर समर्थ ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. अशातच कुकडेच्या बँक खात्यात १०० कोटी रूपये पोलिसांना आढळून आले होते. त्यातील ४० ते ५० कोटी रूपये विविध व्यक्तींच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. कुकडेविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास समर्थ पोलिसांकडे आहे. तर प्रकरणाचे गांभिर्य पाहता गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास केला जात आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत.
पोलिसांचे आयकरसह ईडीला पत्र
आरोपी शंतनू कुकडे याच्या खात्यात तब्बल १०० कोटी रुपये आल्याचे पोलिसांना आढळून आले होते. चेन्नईतील कंपनी असून, त्या कंपनीचा कुकडे हा डायरेक्टर होता. संबंधित कंपनीच्या शेअरद्वारे हे पैसे खात्यात आल्याचे कुकडेने सांगितले आहे. त्याच्या खात्यातून ४० ते पन्नास ५० रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रकरणातील आर्थिक व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिसांनी आयकर विभाग आणि सक्तवसुली संचलनालय (ईडी) यांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार कुकडेच्या बँक खात्याचे फॉरेन्सिक ऑडीट केले जाणार आहे.