कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Crime News : कोरेगाव पार्क भागात दोघांची लुटमार – कोरेगाव पार्क भागात दोघांना धमकावून लुटण्यात आल्याची घटना घडली. चोरट्यांनी मारहाण करुन दोघांकडील मोबाइल आणि रोकड लुटून नेली.याबाबत एकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार पेठेत मेफेड्रोन विक्री करणारा गजाआड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दौंड तालुक्यातील खोंडाचीवाडी परिसरात राहायला आहेत. ते ३ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वाडिया महाविद्यालय परिसरातून निघाले होते. त्यावेळी महावितरण कार्यालयाजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले.
कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली.आरडाओरडा केला, तर जीवे मारू, अशी धमकी दिली. त्यांच्याकडील दहा हजारांचा मोबाइल हिसकावून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार लोणकर तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत कोरेगाव पार्क भागातील चंद्रमा हाॅटेलसमोर एकाला धमकावून त्याच्याकडील मोबाइल हिसकावून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार कोरेगाव पार्क भागात राहायला आहेत. ते १६ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कोरेगाव पार्क भागातून निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना धमकाविले. त्यांच्या नाकावर ठोसा मारुन कोयत्याचा धाक दाखविला. तक्रारदाराला धमकावून रोकड आणि मोबाइल असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार बडे तपास करत आहेत.
मोटारीची काच फोडून लॅपटाॅप चोरी
Crime News : क्वीन्स गार्डन परिसरात मोटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटाॅप लांबविल्याची घटना घडली.
याबाबत एका मोटार चालकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोटारचालक हे विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. रविवारी (६ जुलै) ते दुपारी सव्वाबाराच्या सुमारास क्वीन्स गार्डन भागात आले होते. त्यांनी मोटार विधानभवन परिसरातील एका गल्लीत मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीत ठेवलेला ३५ हजारांचा लॅपटाॅप, तसेच लेझर मेजरिंग टेप असा मुद्देमाल लांबविला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेची ७० हजारांची बांगडी चोरी
Crime News : पीएमपीएल प्रवासी महिलेच्या हातातील ७० हजारांची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर घडली. याबाबत महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पद्मावती परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या शनिवारी (५ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास स्वारगेट ते पद्मावती या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. त्यांच्याबरोबर मुलगा आणि सून होती. बसमध्ये गर्दी होती.
चोरट्यांनी महिलेच्या हातातील बांगडी कटरचा वापर करुन कापून नेली. पद्मावती परिसरात त्या बसमधून उतरल्या. तेव्हा हातातील बांगडी चोरीला गेल्याचे लक्षात आले. गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवाशांकडील दागिने, रोकड चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये चोरटे शिरतात. कटरचा वापर करुन चोरटे बांगडी कापून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.
शाळकरी मुलीचे अपहरण करणारा अटकेत
Crime News : शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिचे अपहरण करणाऱ्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अहिल्यानगर परिसरातून अटक केली.अभिषेक विजय जाधव (वय २२, सध्या रा. गणेशननगर, वडगाव शेरी, मूळ रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वडगाव शेरी भागातून १३ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण केल्याची घटना शनिवारी (५ जुलै) घडली होती. मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, जाधव याने मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचे उघडकीस आले. जाधव आणि मुलगी अहिल्यानगर भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक अहिल्यानगरला रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगरमधून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिचे अपहरण करणारा आरोपी जाधव याला अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शाळकरी मुलीचे अपहरण प्रकरणाचा छडा पोलिसांनी २४ तासात लावून आरोपीला अटक केली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, उपनिरीक्षक सचिन राऊत, पोलीस कर्मचारी देवकाते यांनी ही कारवाई केली.