डॉक्टर महिलेला ५लाखांचा गंडा
marathinews24.com
पुणे – गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एरंडवणे भागातील डॉक्टर महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल हॅक करुन बँक खात्यातून परस्पर रोकड लांबविल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत डॉक्टर महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वीज, गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवित ऑनलाईन लुट केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी अशा मेसेजसह बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मोक्का कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७३ वर्षीय डॉक्टर महिला कर्वेनगर भागातील सहवास सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. गॅस कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रातून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. गॅस बिल थकीत असून, गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी धमकी दिली होती.
त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एमएनजीएल एपीके फाईल पाठविली. ही फाईल त्यांना उघडण्यास सांगितले. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल हॅक केला. मोबाइलमधील बँक खात्याची गोपनीय घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ९५ हजार रुपये लांबविले. खात्यातून रक्कम दुसर्याच खात्यात वळविल्याचे लक्षात आले. पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.
सराफी पेढीतून ५ लाखांचे दागिने लंपास, कोंढव्यातील घटना
खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या महिलांनी ५ लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी सराफी पेढीतील कर्मचार्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपनगरात सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. संबंधित महिलांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागात प्रसिद्ध सराफी पेढीचे दालन आहे. सराफी पेढीत २२ जूनला दोन महिला खरेदीच्या बहाण्याने शिरल्या. महिलांनी बुरखा परिधान केला होता. त्यांनी सराफी पेढीतील कर्मचार्याला महिलांना सोन्याच्या बांगड्या दाखविण्यास सांगितले. त्यानंतर कर्मचार्याने त्यांना बांगड्या दाखविल्या. प्लास्टिक ट्रेमधील बांगड्या पाहण्याचा बहाणा महिलांनी केला.
त्यानंतर कर्मचार्याला बोलण्यात गुंतविले. कर्मचार्याचे लक्ष नसल्याची संधी साधून महिलांनी ५ लाख २२ हजार रुपयांच्या सोन्याच्या चार बांगड्या चोरून नेल्या. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.