दोन घटनेत १४ लाख ५० हजारांचा गंडा
marathinews24.com
पुणे – सायबर चोरट्यांकडून जेष्ठासह तरूणांनाही जाळ्यात अडकविण्याचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे दिसून आले आहे. विविध प्रकारचे आमिष, दुप्पट परतावा, जादा नफा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईनरित्या लुट केली जात आहे. प्रामुख्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडून काही रकमेचा परतावा दिल्यानंतर लाखोंची फसवणूक केली जात आहे. वारंवार घडणार्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, सायबर चोरट्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी केली जात आहे.
बँकॉकहून पुण्याला येणाऱ्या दोन प्रवाशांना अटक, १० कोटींचे अंमली पदार्थ जप्त – सविस्तर बातमी
गुंतवणूकीवर महिन्याला चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी विमाननगरमधील तरूणाला ८ लाख ५० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना डिसेंबर २०२४ ते १ मे २०२५ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार तरूण विमाननगरमध्ये राहायला असून, १ डिसेंबर २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्याला संपर्क केला. व्हॉटसअॅपद्वारे लिंक पाठवून गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. सुरूवातीला काही रक्कम मिळाल्यानंतर तक्रारदार तरूणाचा विश्वास बसला. त्यानंतर त्याने ८ लाख ५० हजार रूपये ऑनलाईनरित्या गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर त्याला परतावा न मिळता, फसवणूक झाल्याचे लक्षात आहे. पोलीस निरीक्षक आशालता खापरे तपास करीत आहेत.
ट्रेडींग स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून परतावा न देता सायबर चोरट्यांनी तरूणाची ५ लाख ८८ हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १६ डिसेंबर ते २१ जानेवारी २०२५ कालावधीत मुंढव्यात घडली आहे. याप्रकरणी संबंधित तरूणाने मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरूण मुंढव्यात राहायला असून, १६ डिसेंबर २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्याला व्हॉटसअॅपद्वारे लिंक पाठविली. ट्रेडींग स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादित करून सायबर चोरट्यांनी तरूणाला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तब्बल ६ लाख ७७ हजार गुंतवणूक केल्यानंतर सायबर चोरट्यांनी ८९ हजारांचा परतावा दिला. उर्वरित ५ लाख ८८ हजारांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करीत आहेत.
सावधान… शेअरमार्केट, ट्रेडींगच्या आमिषाला बळी पडू नका
शेअर मार्केटसह ट्रेडींग स्टॉकमध्ये गुुंतवणूक केल्यास एका महिन्यात दुप्पट परतावा देण्याचे आमिष अंगलट येत आहे. त्यामुळे नागरिकांनो कोणत्याही आमिषाला बळी न पडता गुंतवणूक करू नका. अन्यथा काही लाखो रूपयांच्या बदल्यात तुम्हाला सुरूवातीला किरकोळ रक्कम देउन गंडा घातला जाउ शकतो. परिणामी पश्चातापाची वेळ तुमच्यावर येउ शकते. त्यामुळे साबयर चोरट्यांचे आमिष नफ्याचे नसून, धोक्याचे असल्याचा अनुभव अनेकांना आहे. त्यापासून दूरच राहिले पाहिजे, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.