राज्यभरात मनुष्यबळाचा समतोल साधण्याचा प्रयत्न
marathinews24.com
पुणे – राज्याच्या सर्व भागांमध्ये पशुवैद्यकीय सेवांचा योग्य समतोल, तसेच बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व न्याय्य पद्धतीने पार पडावी, या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुधन विकास अधिकारी (गट-अ) व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (गट-अ) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाच्या माध्यमातून करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे केवळ बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक होणार नाही, तर विभागात कार्यरत अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तृत्व व कार्यक्षमता यानुसार योग्य ठिकाणी नियुक्ती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, राज्याच्या विविध भागांमध्ये पशुसंवर्धनाच्या कामकाजात गुणवत्ता वाढवण्यास यामुळे हातभार लागणार आहे.
समुपदेशनाद्वारे बदल्यांची ही प्रक्रिया १५ व १६ मे २०२५ रोजी पुणे येथील आयुक्त, पशुसंवर्धन कार्यालयात पार पडणार आहे. यामध्ये सुमारे ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असून, त्यांना उपलब्ध पदविकल्पांपैकी त्यांच्या पसंतीनुसार पर्याय निवडण्याची संधी दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने अलीकडेच विभागाची पुनर्रचना करण्यात आली असून, त्याअंतर्गत काही नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या नव्या पदांच्या नियुक्त्या देखील समुपदेशन प्रक्रियेद्वारेच पार पडणार आहेत.
समुपदेशन बदली प्रक्रिया अधिकाऱ्यांसाठी पारदर्शक, न्याय्य आणि समान संधी उपलब्ध करणारी आहे. प्रशासनातील कार्यक्षमता आणि पशुपालकांपर्यंत उच्च दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा पोहोचवण्याचा उद्देश यामागे असून, राज्याच्या पशुसंवर्धन क्षेत्राला नवी दिशा देण्याचे हे पाऊल आहे. हा निर्णय विभागाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, इतर विभागांसाठीही एक आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्तांलयाचे उपायुक्त डॉ. प्रशांत भड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.