विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कौटुंबिक वादातून मेव्हण्याला मारहाण करून त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूला लोखंडी हत्याराने वार केल्याची घटना धानोरीतील भैरवनगरमध्ये घडली. हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी हर्षल गौतम शिंदे (वय ३५, रा. जाधवनगर, येरवडा) याच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बंडू जगताप (वय २९, रा. मु. पो. निंबळक, ता. नगर, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष; ३५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता भैरवनगर, धानोरी येथे ही घटना घडली. आरोपी हा जगताप यांचा मेव्हणा असून, कौटुंबिक वादातून त्याने धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर जगताप यांना हाताने मारहाण केली. आरोपीने त्याच्याकडील लोखंडी हत्याराने जगताप यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला वार केला. गंभीर जखमी झालेल्या जगताप यांच्यावर उपचार करण्यात आले. पोलिस तपास करीत आहेत.
रुग्णवाहिकेसाठी बॅरिकेड हटवल्याने लाकडी दांडक्याने मारहाण
वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला जागा करून देण्यासाठी सोसायटीसमोरील बॅरिकेड हटविल्यामुळे एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि खांद्याला दुखापत झाली. प्रसाद कुंभार (वय अंदाजे २४, रा. फ्लॅट क्रमांक ७०७, अमर समृद्धी सोसायटी, रविदर्शन, हडपसर) याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश सुरेश भोसले (वय ३३, रा. सिद्धी विनायक कॉलनी, लेन क्रमांक चार, पापडेवस्ती, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिटांनी पुणे-सोलापूर रस्त्यावरील रविदर्शन परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी भोसले यांनी बॅरिकेड बाजूला केले. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. हडपसर पोलिस तपास करीत आहेत.






















